दोनपेक्षा अधिक गुन्हे बनवतील ‘हिस्ट्रीशीटर’
By Admin | Updated: December 30, 2015 00:47 IST2015-12-30T00:27:14+5:302015-12-30T00:47:24+5:30
औरंगाबाद : सराईत गुन्हेगारांवर आणखी वचक राहावा यासाठी पोलिसांनी नवीन वर्षात जोमाने काम सुरू करण्याचे ठरविले आहे. यासाठी नव्या, जुन्या सराईत गुन्हेगारांची फेरयादीच तयार केली जात आहे

दोनपेक्षा अधिक गुन्हे बनवतील ‘हिस्ट्रीशीटर’
औरंगाबाद : सराईत गुन्हेगारांवर आणखी वचक राहावा यासाठी पोलिसांनी नवीन वर्षात जोमाने काम सुरू करण्याचे ठरविले आहे. यासाठी नव्या, जुन्या सराईत गुन्हेगारांची फेरयादीच तयार केली जात आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांचाही ‘हिस्ट्रीशीटर’च्या यादीत समावेश केला जात आहे. अशा दीडशेच्या आसपास नव्या कुख्यात गुन्हेगारांची या यादीत भर पडणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी दिली.
औरंगाबादमध्ये पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून अमितेशकुमार यांनी अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली. पोलिसांपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाचे गाऱ्हाणे ऐकून घेऊन ते सोडविण्याचे काम पोलीस करीत आहेत. याबरोबरच गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे कामही नव्या वर्षात सुरुवातीपासूनच आक्रमकपणे करण्याचा मानस पोलीस आयुक्तांनी बोलून दाखविला. आठ दिवसांपासून पोलिसांच्या यादीवर असलेल्या हिस्ट्रीशीटरची चाळणी करण्याचे काम सुरू आहे. आता सक्रिय नसलेले वगळून शहरात दोनपेक्षा जास्त गुन्हे करणारे सुमारे दीडशे गुन्हेगार पोलिसांच्या यादीवर येणार आहेत. यामुळे यादीत भर पडणार आहे.