अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस-आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:28 IST2017-08-21T00:28:16+5:302017-08-21T00:28:16+5:30
शहराला रविवारी पावसाचा मोठा तडाखा बसला. अतिवृष्टीचा इशारा असला तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी अपेक्षा नव्हती. अपेक्षेपेक्षा चौपट पाऊस झाल्याने शहरात सखल भागात पाणी साचल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.

अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस-आयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:शहराला रविवारी पावसाचा मोठा तडाखा बसला. अतिवृष्टीचा इशारा असला तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी अपेक्षा नव्हती. अपेक्षेपेक्षा चौपट पाऊस झाल्याने शहरात सखल भागात पाणी साचल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.
शहरातील सर्वच भागात पाणीच पाणी झाले होते. शहरातील श्रावस्तीनगर, समीराबाग, हमालपुरा या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. शहरातील सखल भागातील घरामध्ये संपूर्ण दिवसभर पाणी होते. सायंकाळी पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे या भागातील नागरिकांची चिंता आणखीनच वाढली आहे. चार तासातच मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील संपूर्ण नाले ओव्हरफ्लो झाले. रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले. सकाळी ८ वाजेपर्यंत अनेक भाग जलमय झाला होते. दुपारी १२ नंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हे पाणी ओसरले होते. मात्र सायंकाळी ५ नंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने चिंता वाढली होती.
राष्ट्रीय मौसम पूर्वानुमान केंद्राने शनिवारी दुपारी दीड वाजता पुन्हा एकदा मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. ही बाब लक्षात घेता महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी तातडीची बैठक बोलावत अधिकाºयांना सूचना दिल्या. महापालिकेचे उपायुक्त, विभाग प्रमुख, आरोग्य अधिकारी त्यासोबतच महापौर शैलजा स्वामी, उपमहापौर शफी अहेमद कुरेशी, स्थायी समिती सभापती मंगला देशमुख यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आयुक्त म्हणाले, महापालिकेच्या चारही क्षेत्रीय कार्यालयात नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. तराफ्यासह, बॅटरी, दोरी क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आले असून बचाव कार्य करताना कोणत्याही साहित्याची कमतरता पडू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे.
नागरिकांना हलवण्यासाठी ८ टेंपो, ४० मजूरही सज्ज ठेवण्यात आले असून २० जीवरक्षक दलही तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी श्रावस्तीनगर येथील बुद्धविहारातही काही नागरिकांनी आश्रय घेतला आहे.