पावसाळ्यात धरणांची परिस्थिती उन्हाळ्यासारखीच
By Admin | Updated: August 10, 2014 02:04 IST2014-08-10T01:49:08+5:302014-08-10T02:04:04+5:30
औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात काहीशी वाढ झालेली दिसत असली, तरी मराठवाड्यातील इतर मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा मात्र खाली गेला आहे.

पावसाळ्यात धरणांची परिस्थिती उन्हाळ्यासारखीच
औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात काहीशी वाढ झालेली दिसत असली, तरी मराठवाड्यातील इतर मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा मात्र खाली गेला आहे. त्यामुळे अर्ध्या पावसाळ्यानंतर विभागातील धरणांची एकत्रित पाणीसाठ्याची स्थिती मे महिन्यासारखीच आहे. सध्या विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी अवघा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
मराठवाड्यात पावसाने अवकृपा केली. संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला तरी विभागातील धरणांतील पाणीसाठ्यात अद्याप वाढ झालेली नाही.
उलट काही प्रकल्पांतील पाणीसाठा जून महिन्याच्या सुरुवातीला जेवढा होता, त्यापेक्षाही कमी झाला आहे. केवळ जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. नगर, नाशिक जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे जायकवाडीतील पाणीसाठा १४ टक्क्यांवर गेला आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी २२ टक्के पाणीसाठा होता. मध्यंतरी हा साठा कमी झाला होता. मात्र, जायकवाडीतील वाढीमुळे सरासरी साठ्यात वाढ झाली. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा साठा २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी धरणांची परिस्थिती उन्हाळ्यासारखीच आहे.
पाच धरणे कोरडीठाक
निम्मा पावसाळा संपला तरी विभागातील सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव या पाच धरणांत शून्य टक्के उपयुक्त साठा आहे. जूनच्या सुरुवातीला यातील माजलगाव धरणात ६ टक्के साठा होता. उर्ध्व पेनगंगा धरणातील पाणीसाठाही ५० टक्क्यांवरून ४३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मनार धरणातील साठा २२ वरून १४ टक्क्यांवर, निम्न दुधनातील साठा ३५ वरून ३० टक्क्यांवर आणि येलदरी धरणातील साठा ४५ टक्क्यांवरू न ३९ टक्क्यांवर आला आहे.