मान्सूनपूर्व पावसाची धडाकेबाज हजेरी
By Admin | Updated: June 8, 2017 00:14 IST2017-06-08T00:13:22+5:302017-06-08T00:14:49+5:30
परभणी : मंगळवारी रात्री मान्सनपूर्व पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने नागरिक सुखावले आहेत़

मान्सूनपूर्व पावसाची धडाकेबाज हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मंगळवारी रात्री मान्सनपूर्व पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने नागरिक सुखावले आहेत़ विशेष म्हणजे, पहिल्याच सर्वदूर पावसाने जिल्ह्यातील बंधारे, ओढे आणि नाल्यांना पाणी वाहिले़ जिल्हाभरात सरासरी २६ मिमी म्हणजे १ इंच पाऊस झाला आहे़
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून तापमानात वाढ झाली होती़ यावर्षी शेवटच्या दोन्ही महिन्यामध्ये जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंश एवढे राहिले़ त्यामुळे कडक उन्हाने नागरिक त्रस्त झाले होते़ पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने दिलासा मिळाला़ रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परभणी शहर परिसरात पावसाला प्रारंभ झाला़ विजांच्या कडकडाटांसह एक तास जोरदार पाऊस झाला़ त्यानंतर सकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच राहिली़ मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत़
या पहिल्याच पावसामुळे शहर व परिसरात पाणीच पाणी झाले होते़ सखल भागामध्ये पाणी साचल्याने पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली़ शहरातील वसाहतींमधील रस्ते चिखलमय झाल्याचे दिसून आले़ शहराच्या शेजारून वाहणाऱ्या पिंगळगड नाल्याला पाणी आले़ परभणी तालुक्याबरोबरच पाथरी, सेलू, मानवत, जिंतूर, पालम, सोनपेठ तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे़