औषधांच्या पुरवठ्यात घाटीमध्ये ‘मक्तेदारी’
By Admin | Updated: July 3, 2017 01:05 IST2017-07-03T01:03:09+5:302017-07-03T01:05:08+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात विविध औषधांचा काही ठराविक कंपन्यांकडूनच पुरवठा होत आहे

औषधांच्या पुरवठ्यात घाटीमध्ये ‘मक्तेदारी’
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात विविध औषधांचा काही ठराविक कंपन्यांकडूनच पुरवठा होत आहे. या कंपन्यांशिवाय ही औषधी प्राप्त होऊ शकत नाही. वेळेवर बिले प्राप्त न झाल्यास त्यांच्याकडून पुरवठा बंद होतो आणि रुग्णांची गैरसोय होते. मक्तेदारीमुळे अडवणूक करणाऱ्या या कंपन्यांना स्पर्धक शोधण्याऐवजी त्या कंपन्यांची बिले प्राधान्याने देण्याची सूचना घाटी प्रशासनाने केली आहे. या कंपन्यांसमोर घाटी प्रशासनाची शरणागती आहे की, व्यवहारिक तडजोड याविषयी वैद्यकीय वर्तुळातच खमंग चर्चा आहे.
औषधी व साहित्याचा पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यांचे पैसे वेळोवेळी थकत असल्याने घाटीला दरपत्रकावरील कंपन्यांकडून औषधी पुरवठा थांबविला जातो. औषधी खरेदीत होणारे घोटाळे टाळण्यासाठी आणि या व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सेंट्रल पर्चेस कमिटीकडून औषधी खरेदी करून पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे स्थानिक खरेदीवरही (लोकल पर्चेस) निर्बंध आले आहेत. गेल्या काही महिन्यांत औषधांची थकबाकी ७ कोटींवर पोहोचली होती. त्यातून मध्यंतरी घाटीतील औषधी पुरवठा विस्कळीत झाला.
मे महिन्यात औषधींच्या तुटवड्यामुळे बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागात गोरगरीब रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. नाईलाजाने पदरमोड करून बाहेरून औषधी खरेदी करण्याची वेळ रुग्णांंवर आली.
मे महिन्यात घाटी रुग्णालयाकडून सामान्य आणि अत्यावश्यक अशा ६७ प्रकारच्या औषधींची यादी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयास (डीएमईआर) पाठविण्यात आली. तसेच मंजूर झालेल्या १ कोटी ६३ लाखांच्या निधीतून थकबाकीदारांची बिले अदा करण्यात आली. उच्च रक्तदाब, मधुमेह, विविध प्रकारची प्रतिजैविके यासह महत्त्वाच्या औषधांच्या कायम तुटवड्याला घाटीला सामोरे जावे लागते.
घाटीला काही औषधींचा पुरवठा ठरावीक कंपन्यांकडून होतो. त्यांची बिले थकल्यास थेट पुरवठा थांबविला जातो. यातूनच रुग्णसेवा विस्कळीत होते. औषधी प्राप्त होण्यास अन्य पर्याय नसल्याने थकित बिले देण्याशिवाय पर्याय नसल्याचा दावा घाटी प्रशासनाकडून केला जात आहे.