तुटलेल्या जाळीतून माकड बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 23:55 IST2016-01-17T23:46:01+5:302016-01-17T23:55:06+5:30
औरंगाबाद : मनपाच्या प्राणिसंग्रहालयात रविवारी अचानक जुन्या पिंजऱ्याच्या तुटलेल्या जाळीतून एक माकड बाहेर पडले. बाहेर येताच त्याने पर्यटकांना जखमी करण्यास सुरुवात केली.

तुटलेल्या जाळीतून माकड बाहेर
औरंगाबाद : मनपाच्या प्राणिसंग्रहालयात रविवारी अचानक जुन्या पिंजऱ्याच्या तुटलेल्या जाळीतून एक माकड बाहेर पडले. बाहेर येताच त्याने पर्यटकांना जखमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सर्व पर्यटकांना बाहेर काढून तातडीने प्राणिसंग्रहालय रिकामे करण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन तास प्रयत्न करून या माकडाला पुन्हा पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. यावेळी माकडाच्या हल्ल्यात प्राणिसंग्रहालयातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
रविवारच्या सुट्टीमुळे आज प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची मोठी गर्दी होती. त्यातच सकाळी ११ वाजता एक माकड पिंजऱ्याच्या जाळीतून उडी मारून बाहेर आले. त्यावेळी पिंजऱ्याच्या जवळ अनेक लहान मुले, महिला होत्या. बाहेर पडताच उड्या मारत माकडाने पर्यटकांना ओरखडे मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रचंड गदारोळ माजला. प्राणिसंग्रहालय प्रशासनाने खबरदारी म्हणून लगेचच सर्व पर्यटकांना बाहेर काढून प्राणिसंग्रहालयाचे गेट बंद केले. लगेचच वन विभागाला याविषयी माहिती देण्यात आली. दुसरीकडे प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांन या माकडाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले; परंतु ते दूर दूर उड्या मारून पळत होते. एखादा कर्मचारी पकडण्यास गेला तर त्याला हाताच्या पंजाने मारत होते. दोन तासांच्या परिश्रमानंतर प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी माकडाला पकडून पुन्हा पिंजऱ्यात बंद करण्यात आले; मात्र तोपर्यंत प्रवीण बत्तीसे आणि दुसरा एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला. माकडाला जेरबंद केल्यानंतर लगेचच पिंजऱ्याच्या जाळीची डागडुजी करण्यात आली. इतर पिंजऱ्यांचाही आढावा घेण्यात आला.