सरपंचावर पैशांच्या अपहाराचा ठपका!
By Admin | Updated: August 7, 2014 00:16 IST2014-08-07T00:13:30+5:302014-08-07T00:16:43+5:30
आखाडा बाळापूर : आश्रमशाळेला पाणीपुरवठा करण्याच्या बदल्यात मिळणारी अधिग्रहणाची पावणेचार लाख रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा केली

सरपंचावर पैशांच्या अपहाराचा ठपका!
आखाडा बाळापूर : आश्रमशाळेला पाणीपुरवठा करण्याच्या बदल्यात मिळणारी अधिग्रहणाची पावणेचार लाख रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा केली न करता ती परस्पर हडप केल्याचा ठपका एका सरपंचावर ठेवण्यात आला आहे. कळमनुरी पंचायत समितीने नेमलेल्या चौकशी समिती पथकाने कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथील सरपंचावर ठेवला आहे.
कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळेला सन २००९- २०१३ पर्यंत बेलथर येथील ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा केला आहे. या अधिग्रहणापोटी शाळेने ३ लाख ९२ हजार ८९ रुपये सरपंचास अदा केले होती. ही रक्कम सरपंचाने ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा न करता परस्पर उचलून खर्च केली. या रकमेची व आश्रमशाळेसाठी ठक्कर बापा योजनेंतर्गत मिळालेल्या साडेपाच लाख रुपयांच्या विहिरीची घोषणा बेलथर येथील माजी ग्रा. पं. सदस्य राजू पाईकराव याने माहिती अधिकारांतर्गत उघड केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी पं. स. समोर ३ जून रोजी उपोषण केले होते. तेव्हा बीडीओंनी विस्तार अधिकारी एस. टी. खंदारे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. त्यात ९ जुलै रोजी सरपंच व ग्रामसेवक यांना पाणी अधिग्रहणाच्या ३ लाख ९२ हजार ८९ रुपये खर्चाची कारणे दाखवा नोटीस बजावली. ग्रामसेवकांनी सदर रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमाच झाली नसल्याने सचिव म्हणून खर्च करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले. तर ही रक्कम नाली बांधकामावर सरपंचाने खर्च केल्याचे सादर केलेल्या खुलाशात म्हटले आहे; परंतु हा खर्च कायदेशीर बाबीत बसत नसल्याने आपणास ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ प्रमाणे पदावरून बडतर्फ का करण्यात येऊ नये? असे चौकशी अधिकाऱ्याने बजावले आहे. दुसरीकडे ठक्करबापा योजनेंतर्गत मिळालेली विहिरच गायब झाल्याने ग्रामसेवक, अभियंते, कंत्राटदार, गटविकास अधिकारी या बड्यांची साखळीच आता गळाला लागणार असल्याने मागील दोन महिन्यांपासून चौकशी थंडबस्त्यात आहे. या विहिरीचीही चौकशी करण्याची मागणी असताना चौकशी करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे.
ग्रामस्थांमध्ये चर्चा
पाईकराव यांनी माजी सरपंचाला सोडून विद्यमान सरपंचाच्याच कार्यकाळाची चौकशीसाठी उपोषण केले. मागील आठ ते नऊ वर्षांपासून परस्पर पैसे उचलून दोन्ही सरपंचांनी खर्च केले आहेत. त्यांच्या कार्यकाळाची चौकशीही व्हावी, अशी मागणी आहे.
रक्कम परस्पर उचलून बेकायदेशीर खर्च केल्याने सरपंचाच्या अपात्रतेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणार आहे. विहिरीविषयीचे प्रकरण उपअभियंत्याकडे पाठवले आहे.
- एस.टी. खंदारे, चौकशी अधिकारी कळमनुरी.
उचललेली रक्कम बेलथरच्या विकास कामांसाठी खर्च केली आहे. त्यामध्ये नालीचे बांधकाम केले आहे. त्या कामात कुठल्याही प्रकारचा अपहार केलेला नाही.
- रामराव खंदारे, सरपंच, बेलथर, ता. कळमनुरी