पुढील गणेशोत्सवाआधी मोंढा स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:58 IST2017-09-13T00:58:38+5:302017-09-13T00:58:38+5:30
पुढील गणेशोत्सवाच्या आधी मोंढा स्थलांतर करण्याचे लक्ष्य बाजार समितीने ठरविले आहे.

पुढील गणेशोत्सवाआधी मोंढा स्थलांतर
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जाधववाडीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात ४१३ रुपये दराप्रमाणे १५०० प्रतिचौरस फुटाचा प्लॉट खरेदी करण्यास अखेर होलसेल व्यापाºयांनी सहमती दर्शविली आहे. पुढील गणेशोत्सवाच्या आधी मोंढा स्थलांतर करण्याचे लक्ष्य बाजार समितीने ठरविले आहे. त्यादृष्टीने नवीन प्रस्ताव तयार करणे, तो मंजूर करून घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकला आणि मोंढा स्थलांतराच्या दृष्टीने नियोजनबद्ध प्रक्रियेने एकदम गती धरली आहे. दिलेल्या आश्वासनानुसार विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मोंढा स्थलांतराला प्रथम प्राथमिकता दिली आहे. त्यांनी संचालक व व्यापाºयांची बैठक घेऊन मोंढ्यातील होलसेल व्यवहाराचे नियोजनबद्ध पद्धतीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले. उल्लेखनीय म्हणजे हरिभाऊ बागडे जेव्हा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनीच तेथील जुन्या मोंढ्यातील व्यवहाराचे स्थलांतर करून घेतले होते. यामुळे आता त्यांनी मोंढा स्थलांतरात लक्ष घालत्याने हा प्रश्न मार्गी लागणार, अशी नवी आशा सर्वांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार जाधववाडीतील बाजार समितीच्या मिटिंग हॉलमध्ये सभापती राधाकिसन पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. यात उपसभापती भागचंद ठोंबरे, दामोदर नवपुते, गणेश दहीहंडे, व्यापारी संचालक प्रशांत सोकिया, हरिशंकर दायमा, किराणा होलसेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश सेठी आदींची यावेळी उपस्थिती होती. रेडिरेकनर दरानुसार ४१३ रुपये दराप्रमाणे १५०० प्रतिचौरस फुटाचा प्लॉट व्यापाºयांना देण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. सुमारे ६ एकरवर यासाठी २०० प्लॉट पाडण्यात येणार आहेत. यावेळी व्यापाºयांनी सांगितले की, दोन हप्त्यांमध्ये रक्कम देण्याची सुविधा देण्यात यावी, त्यास संचालकांनी मान्यता दिली. बारा-सातची परवानगी मिळताच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी व्यापाºयांनी ३०० रुपयांप्रमाणे रक्कम भरावी व उर्वरित ११३ रुपयांप्रमाणे होणारी रक्कम ५ वर्षांत बाजार समितीकडे जमा करावी, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात सचिव विजय सिरसाठ यांनी सांगितले की, पहिल्यांदाच प्लॉटच्या दरावर व्यापाºयांनी सहमती दर्शविली आहे. आम्ही असे नियोजन करीत आहे की, पणन संचालनाकडून बारा/ एकची परवानगी मिळाल्यावर वर्षभरात व्यापाºयांनी दुकान बांधून स्थलांतर करावे. त्यानुसार पुढील गणेशोत्सवाच्या आधी मोंढा स्थलांतराचे उद्दिष्ट आम्ही ठरविले आहे.
संचालक-व्यापाºयांचा अभ्यास दौरा
मोंढा स्थलांतरासाठी एकीकडे बैठकांवर बैठका सुरूअसताना मंगळवारी दुपारी बाजार समितीचे सभापती, संचालक व मोंढ्यातील व्यापारी प्रतिनिधी जालन्याला अभ्यास दौºयावर गेले. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेली नवीन मोंढ्याची रचना व तेथील सोयीसुविधा याची पाहणी त्यांनी केली.