परभणीतील मोंढा बंद
By Admin | Updated: June 30, 2017 23:45 IST2017-06-30T23:41:28+5:302017-06-30T23:45:23+5:30
परभणी : सेवा आणि वस्तू कर अर्थात जीएसटी कर तत्काळ रद्द करावा, या मागणीसाठी शुक्रवारी परभणी शहरातील मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवून या कायद्याला विरोध दर्शविला.

परभणीतील मोंढा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सेवा आणि वस्तू कर अर्थात जीएसटी कर तत्काळ रद्द करावा, या मागणीसाठी शुक्रवारी परभणी शहरातील मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवून या कायद्याला विरोध दर्शविला. बंदमुळे औषधी, खत, बी-बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.
देशभरात १ जुलैपासून सेवा आणि वस्तू कर अर्थात जीएसटी ही करप्रणाली लागू होत आहे; परंतु, ही करप्रणाली लागू झाल्यास महागाईमध्ये वाढ होणार आहे, अशी चर्चा होत आहे. तसेच या कराबद्दल व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस आहेत. त्यामुळे हा कर लागू झाल्यास शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही अडचणीचे ठरु शकते. या करामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा जीएसटी कर तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी ३० जून रोजी दिवसभर परभणीतील मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. त्यामुळे ग्रामीण भागातून बी-बियाणे, खते, औषधी खरेदी करण्यासाठी मोंढ्यात दाखल झालेल्या शेतकऱ्यांची मात्र गैरसोय झाल्याचे पाहावयास मिळाले.