औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला ३ वर्षांनंतर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:02 IST2021-02-28T04:02:22+5:302021-02-28T04:02:22+5:30

औरंगाबाद, गंगापूर, नेवासा, शनिशिंगणापूर, अहमदनगर येथे पाहणी औरंगाबाद : केंद्र सरकारने २०१८ मध्ये अर्थसंकल्पात औरंगाबाद-अहमदनगर या १२० कि.मी. अंतराच्या ...

Moment after 3 years of survey of Aurangabad-Nagar railway line | औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला ३ वर्षांनंतर मुहूर्त

औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला ३ वर्षांनंतर मुहूर्त

औरंगाबाद, गंगापूर, नेवासा, शनिशिंगणापूर, अहमदनगर येथे पाहणी

औरंगाबाद : केंद्र सरकारने २०१८ मध्ये अर्थसंकल्पात औरंगाबाद-अहमदनगर या १२० कि.मी. अंतराच्या नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. तब्बल ३ वर्षांनंतर या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या फिल्ड सर्वेक्षणाला मुहूर्त मिळाला आहे. १ मार्च ते ६ मार्चदरम्यान मध्य रेल्वेच्या पथकाकडून सर्वेक्षण केले जाणार आहे.

औरंगाबाद-नगर या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी २०१८ मध्ये २१ लाख ७५ हजार रुपयांची केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद झाली होती. परंतु तीन वर्षांपासून हा मार्ग सर्वेक्षणाअभावी रखडलेला आहे. आता कुठे या मार्गाच्या सर्वेक्षणाला वेग दिला जात आहे. रेल्वे मार्गाच्या फिल्ड सर्वेक्षणासाठी ट्राफिक सर्व्हेची टीम १ मार्च रोजी औरंगाबादेत दाखल होणार आहे. ४ तारखेपर्यंत हे पथक रस्ते मार्गाने औरंगाबाद, गंगापूर, नेवासा, शनिशिंगणापूर, अहमदनगर येथे भेट देऊन पाहणी करणार आहे. या भेटीदरम्यान औद्योगिक क्षेत्र, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, ट्रान्स्पोर्ट वाहतूकदार यांच्याकडून आढावाही घेणार आहे. या मार्गाच्यादृष्टीने प्रवासी क्षमतेचा अभ्यास केला जाणार आहे. औरंगाबादहून रस्ते मार्गाने नगर, पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे औरंगाबाद-नगर हा रेल्वेमार्ग अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुढे पुण्यापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी मिळण्याच्यादृष्टीने या मार्गाची सुरुवात आवश्यक असल्याचे रेल्वे संघटनांचे म्हणणे आहे.

सर्व स्तरातून पाठपुरावा

उद्योजक, लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्याकडून रेल्वे प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा केला जात आहे. त्यातून रेल्वे मंत्रालयाकडून कामे होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद-नगर मार्गाचे सर्वेक्षण आता सुरू होत आहे, असे उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले.

Web Title: Moment after 3 years of survey of Aurangabad-Nagar railway line