मुंडेंच्या भोवतीच फिरली मोदींची सभा

By Admin | Updated: October 5, 2014 00:49 IST2014-10-05T00:31:03+5:302014-10-05T00:49:18+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Modi's rally revolves around Munde | मुंडेंच्या भोवतीच फिरली मोदींची सभा

मुंडेंच्या भोवतीच फिरली मोदींची सभा



व्यंकटेश वैष्णव , बीड
जिल्ह्यातील सहा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या सगळ्या रणधुमाळीत विकासाचे मुद्दे गायब होतात की काय? अशी भीती आता जाणत्या सर्वसामान्य मतदारांमध्ये व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ बीडमध्ये शनिवारी फोडला. ही सभा पंतप्रधान मोदींनी निश्चितच जिंकली पण स्थानिक उमेदवारांनी मात्र आपापल्या भाषणांमधून भावनिक मुद्देच लाखो जनसमुदायापुढे मांडले. यामुळे या निवडणुकांमध्ये केवळ भावनिक मुद्यांचा गाजावाजा करीतच सर्वच पक्षाचे उमेदवार जनतेमध्ये उतरणार की, विकासाच्या मुद्यावरुन आरोप-प्रत्यारोप होणार? हे पाहण्यासाठी वेळ जावा लागणा आहे.
साहेब ग्रामविकासाला चालना देणार होते... साहेब असते तर ऊसतोड कामगार निराधार दिसला नसता... सभास्थळी आलेली ही जनता मुंडे साहेबांवर प्रेम करणारी आहे... अन् आता मुंडेसाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचयं, असे भावनिक उद्गार बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी व्यासपीठावरुन काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या भावनिक मुद्यांभोवतीच फिरली असल्याचे चित्र शनिवारी पहावयास मिळाले.
विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा बीड येथे शनिवारी पार पडली. यावेळी व्यासपीठावर बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभेचे उमेदवार उपस्थित होते. यामध्ये पंकजा मुंडे, विनायक मेटे, अ‍ॅड. लक्ष्मण पवार, भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, आर.टी. देशमुख यांची उपस्थिती होती. पंतप्रधान मोदींचे मंचावर आगमन होण्यापूर्वी सहाही उमेदवारांची भाषणे झाली. सभेला जिल्ह्यातून हजारो नागरिक उपस्थित होते. यामध्ये सर्वच मतदारसंघातील मतदारांचा समावेश होता. याप्रसंगी विकासाच्या मुद्यावर विरोधकांवर उमेदवार आक्रमक होतील, अशी अपेक्षा उपस्थित असलेल्या जनसागराला होती. मात्र जनतेचा भ्रमनिराश झाल्याचे चित्र मोदींच्या सभेत ६ ही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून झाले असल्याचे पहावयास मिळते. भाषणासाठी उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार सर्वप्रथम प्रीतम मुंडे यांना निवडून द्या, असे बोलून स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विषयी बोलायचे. आजस्थितीत बीड, गेवराई, माजलगाव, आष्टी, केज व परळी या मतदारसंघांमध्ये विकासापासून दुर्लक्षित राहिलेले अनेक मुद्दे आहेत. याबाबत एकाही उमेदवाराने ‘ब्र’ शब्द देखील काढला नाही.
खरं तर बीड जिल्ह्यातील भाजपाच्या उमेदवारांसाठी मोदींच्या सभेत बोलण्याची नामी संधी उमेदवारांना मिळाली होती. पुढे लाखोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आपापल्या मतदारसंघातील अनेक विकासाचे मुद्दे घेऊन मागच्या कार्यकाळात सत्तेवर असणाऱ्यांना धारेवर धरता आले असते, ते जनतेला अपीलही झाले असते. मात्र लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे व स्व. गोपीनाथ मुंडे यांंच्या पलीकडे एकाही भाजपाच्या उमेदवाराला जाता आले नाही.
यामुळे लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाचा भ्रमनिराश तर झालाच आहे. मात्र उमेदवारही एकाच वेळी लाखो मतदारांच्या मनात आपली छाप पाडू शकले नाहीत हे वास्तव चित्र पहावयास मिळाले.
मी स्व. गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणून तुमच्यासमोर उभी आहे, मला आशीर्वाद द्या - डॉ. प्रीतम मुंडे
४जिल्ह्यातील जनतेने त्यांचा नेता तर मी माझा पिता गमावला आहे. स्व. मुंडे यांनी ३५ वर्षे जिल्ह्याची सेवा केली आहे मला मान खाली घालायला लावू नका - पंकजा मुंडे
४बीड जिल्ह्यातील सहाही जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून यावेत हे स्वप्न स्व. गोपीनाथ मुंडे यांनी पाहिले होते ते आता मतदारांनी पूर्ण करावे - आर.टी. देशमुख
४मुंडे साहेबांच्या आशीर्वादानेच मी आज तुमच्या पुढे उभी आहे - प्रा. संगीता ठोंबरे
४जिल्ह्याला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी साथ द्या. आता स्व. मुंडेनंतर पंकजा मुंडेच आपल्या नेत्या आहेत. त्यांना मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पहायचे आहे - विनायक मेटे
४स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त करायचा- अ‍ॅड. लक्ष्मण पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर येण्यापूर्वी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपली भाषणे उरकून घेतली. पंतप्रधान मोदी यांचे मंचावर आगमन होण्यापूर्वी बीड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार विनायक मेटे यांनी भाषण केले. इतर पाच उमेदवारांच्या तुलनेत विनायक मेटे यांनी बीडच्या स्थानिक प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी बीडच्या रेल्वेचा विषय मांडण्यासाठी सुरुवात केली. तोपर्यंत मोदी मंचावर पोहचले. मोदी मंचावर आल्यामुळे मेटे यांना आपले भाषण थांबवावे लागले. यामुळे त्यांना देखील म्हणावे तसे बीड विधानसभा मतदारसंघातील विकासाचे मुद्दे उपस्थित जनसमुदायापुढे ठेवता आले नाहीत. एकंदरीत ही सभा मोदींनी जिंकली असली तरी भाजपाच्या सहाही उमेदवारांना या सभेवर आपली पकड ठेवता आली नाही हे वास्तव चित्र उपस्थित जनसागराने शनिवारी अनुभवले.

Web Title: Modi's rally revolves around Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.