मोदी मास्तरांचा तास; विद्यार्थ्यांना कुतूहल
By Admin | Updated: September 6, 2014 00:42 IST2014-09-06T00:38:02+5:302014-09-06T00:42:20+5:30
औरंगाबाद : मोदी मास्तरांनी भरविलेल्या शाळेचे शहरातील विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण आणि कुतूहलही होते

मोदी मास्तरांचा तास; विद्यार्थ्यांना कुतूहल
औरंगाबाद : मोदी मास्तरांनी भरविलेल्या देशस्तरीय शाळेचे शहरातील विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण आणि कुतूहलही होते; परंतु शाळांकडे सभागृहाची वानवा, सदोष दूरचित्रवाणी व लाऊड स्पीकर यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह मावळला. पंतप्रधानांनी त्यांच्याशी साधलेला संवाद त्यांना ना कळला, ना उमजला...
‘सक्ती असावी की नसावी’ यावरून उडालेल्या गदारोळामुळे अगोदरच चर्चेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्तरांच्या शाळेविषयी शुक्रवारी प्रचंड उत्सुकता दिसून आली. बहुतांश शाळांनी आजचे स्वंयशासन दिनाचे कार्यक्रम रद्द केले होते. त्यामुळे दुपारनंतर मुले शाळेत आली. मोदी काय बोलणार याविषयी त्यांच्यात कुतूहल होते.
मोदी यांनी दुपारी ३ वाजता प्रत्यक्ष संवादास सुरुवात केली. तेव्हा मुलांचे कान टवकारले होते. मोदींनी बोलण्यास सुरुवात करताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मोदी एखादा प्रश्न दूरचित्रवाणीवरून विचारताच, येथे दूरचित्रवाणीसमोर बसलेली मुले उत्तर देण्यासाठी उत्स्फूर्त हात वर करताना दिसत होती. काही विद्यार्थी मोदी गुरुजी जे सांगत होते, ते वहीवर टिपून घेत होते. आवडलेल्या संवादावर टाळ्या पडत होत्या.
अडचणी अनंत
५० विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या क्षमतेपेक्षा मोठ्या वर्ग खोल्या अनेक शाळांमध्ये नाहीत. त्यामुळे जागा मिळेल तशा अवस्थेत मुलांना बसविण्यात आले होते. काही शाळांनी थेट मैदानात विद्यार्थ्यांना बसवून फक्त त्यांना भाषण ऐकण्याची व्यवस्था केली होती. लहान दूरचित्रवाणी संचावरून मोदी विद्यार्थ्यांना स्पष्ट दिसत नव्हते, तर सदोष स्पीकरमुळे ते काय बोलतात, हे स्पष्ट ऐकूही येत नव्हते. त्यामुळे चिमुरड्यांना हे पावणेदोन तास कंटाळवाणे झाले. गुजराती कन्या प्रशालने मात्र विद्यार्थिनींना बसण्यासाठी खास मंगल कार्यालयात व्यवस्था केली होती. एलसीडी प्रोजेक्टरवरून मोदींचा संवाद प्रक्षेपित करण्यात आला; परंतु या भागात चार वाजेच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे विद्यार्थिनींचा हिरमोड झाला. या दोन तासांदरम्यान शहरात काही भागांत वीज पुरवठा खंडित झाला होता.
घरोघरी भरली शाळा
शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळातून मोदी संवादाच्या कार्यक्रमाला थंड प्रतिसाद मिळाला. अनेक शाळांनी कोणतीही व्यवस्था केली नव्हती . त्यामुळे ही मुले घरी बसून दूरचित्रवाणी संचावरून मोदी गुरुजींच्या शाळेत सहभागी झाले. ग्रामीण भागातील अनेक शाळांतून दूरचित्रवाणी संच नसल्यामुळे एखाद्या विशिष्ट घरी शाळा भरविण्यात आल्या. धामणगाव जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गावातील नागरिक बशीर पटेल यांच्या निवासस्थानी शाळा भरविली.