‘मोदी सरकारचा उद्योगपतीचा चेहरा लवकरच बाहेर येईल’
By Admin | Updated: May 30, 2014 01:01 IST2014-05-30T00:46:29+5:302014-05-30T01:01:54+5:30
औरंगाबाद : मोदी सरकार गरिबाला थारा देणार नाही, या सरकारचा उद्योगपतीचा चेहरा लवकरच बाहेर येईल, असे मत आम आदमी पार्टीचे मयंक गांधी यांनी व्यक्त केले.

‘मोदी सरकारचा उद्योगपतीचा चेहरा लवकरच बाहेर येईल’
औरंगाबाद : मोदी सरकार गरिबाला थारा देणार नाही, या सरकारचा उद्योगपतीचा चेहरा लवकरच बाहेर येईल, असे मत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, तथा महाराष्ट्र प्रभारी मयंक गांधी यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची मीमांसा करण्यासाठी आपतर्फे गुरुवारी मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मयंक गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत आम्ही वाहून गेलो; परंतु विधानसभेत निकाल वेगळेच येतील. आम्ही काँग्रेसला पर्याय म्हणून समोर आलो असून, भविष्यात भाजपा व आम्हीच राहू. काँग्रेस नेस्तनाबूत होईल. लोकसभेत पराभव का झाला, यावर दिवसभरात झालेल्या मंथनाचा सार सांगताना ते म्हणाले, मोदी लाटेमुळे संभ्रमित झालेला कार्यकर्ता, राजकीय डावपेच, पैशांची कमतरता, कार्यकर्त्यांतील समन्वय व प्रशिक्षणाचा अभाव आदी आमची पराभवाची कारणे आहेत. परंतु भविष्यात आम्ही कार्यकर्त्यांना अधिक सबळ करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणार आहोत. कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देणार आहोत. यावेळी नंदू माधव, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, मनीषा चौधरी, हरमितसिंग, जालन्याचे सुभाष देठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.