मोदी सरकारची धोरणे शेतकरी विरोधी - शरद पवार
By Admin | Updated: October 7, 2014 00:14 IST2014-10-07T00:08:19+5:302014-10-07T00:14:25+5:30
लोहा : मोदी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे,

मोदी सरकारची धोरणे शेतकरी विरोधी - शरद पवार
लोहा : 'अच्छे दिन आनेवाले है'चा नारा देऊन केंद्रात भाजपाने सत्ता मिळविली़, परंतु अद्याप शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेला बुरे दिन आहेत़ मोदी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंधार येथे केला़
कंधार येथील पानभोसी रस्त्यावरील मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकरअण्णा धोंडगे यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, शेती व्यवसाय हा सध्या संकटात सापडला आहे़ भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती हा कणा आहे़ शेतीचा अभ्यास करणारा शेतीसाठी हिताची भूमिका घेणारा व्यक्ती असावा लागतो़ देशातील जनतेला, शेतकऱ्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले़ या सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती़, परंतु मोदी सरकारकडे शेतकऱ्यांच्या विकासाचे कोणतेही धोरण नसल्याचे सद्य:स्थितीस दिसते़ त्यामुळेच शेतीमालाचे भाव घसरले आहेत़ निर्यातबंदी लागू केली़ कांदा, सोयाबीन किमतीत घसरण झाली़ मी केंद्रीय कृषिमंत्री असताना निर्यातीला वाव दिला़ त्यामुळे सोयाबीन ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल होते़ अशीच अवस्था कांद्याच्या बाबतीतदेखील झाली़ मोदी सरकारकडे शेतकरी विकासाचा दृष्टिकोन नसल्यामुळे भाजपाची पोटनिवडणुकीत घसरण झाली़ ज्या उत्तर प्रदेशने भाजपाला मोठे यश मिळवून दिले, त्याच राज्यात झालेल्या लोकसभेनंतरच्या पोटनिवडणुकीत भाजपाची घसरण झाली़ मी कृषिमंत्री असताना ७० कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून शेतीसाठी १२ टक्क्यांवरून शून्य टक्के व्याजदरावरील विशिष्ट मर्यादेचे कर्ज वितरीत करण्याचे धोरण आखून त्याची अंमलबजावणी केली़ देशातील ६७ टक्के लोकसंख्येसाठी अन्नसुरक्षेचा कायदा करून त्याची अंमलबजावणी केली़ पंतप्रधान असलेले मोदी देशाचा कारभार सोडून महाराष्ट्रात अधिकचा प्रचार करत आहेत़ भाजपाकडून महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या जाहिराती टेलीव्हीजनवरून केल्या जात आहेत़ (वार्ताहर)
‘सत्तेचा वापर तुमच्यासाठी करु’
नायगाव बाजार : महाराष्ट्राची सत्ता राष्ट्रवादीच्या हातात द्या, त्या सत्तेचा वापर तुमच्यासाठी करू, त्याची काळजी मी घेतो, असे आवाहन शरद पवार यांनी केले. नायगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते़ ते म्हणाले, लोकसभेला असलेली मोदींची लाट ओसरली आहे़ त्याचे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला ९ पैकी ८ जागांवर पराभव पत्करावा लागला़ त्यातच मोदी सरकारने साखरेचे अनुदान बंद केले़ डाळिंब व सोयाबीनची निर्यात बंद केल्याने शेतीमालाचे भाव कमी झाले आहेत़ त्यामुळे शेतकरी संकटात सापडू लागला आहे़ असे पाहत भाजपाचे सरकार आपल्याला परवडणार नाही, हे आता लोकांना माहीत झाले आहे, असे ते म्हणाले़या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले की, विधान परिषदेवर मी त्यांना सहा वर्षांसाठी आमदार केलो़ पुन्हा ५ वर्षे आमदार ते माझ्यामुळेच राहिले़ यावेळी मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतली़ ते काही मला योग्य वाटले नाही़ एकाच ठिकाणी राहून संसार केलेला बरा असतो़ परंतु सध्या अनेक जण दुसरा संसार मांडत आहेत़ व्यासपीठावर माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी खा. गंगाधरराव कुंटूरकर, दत्ता पाटील चोळाखेकर, मोहनराव पाटील टाकळीकर, पांडुरंग गायकवाड, भगवानराव भिलवंडे, मीनाक्षी कागडे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)