बदलत्या जीवनशैलीनुसार बांधली जातायेत आधुनिक अपार्टमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:12 IST2021-01-08T04:12:04+5:302021-01-08T04:12:04+5:30
बदलत्या जीवनशैलीनुसार बांधली जातायेत आधुनिक अपार्टमेंट बदल : मोठ्या फ्लॅटमध्ये राहण्याची उत्सुकता औरंगाबाद : लॉकडाऊननंतर जीवनशैलीत व वैचारिक बदल ...

बदलत्या जीवनशैलीनुसार बांधली जातायेत आधुनिक अपार्टमेंट
बदलत्या जीवनशैलीनुसार बांधली जातायेत आधुनिक अपार्टमेंट
बदल : मोठ्या फ्लॅटमध्ये राहण्याची उत्सुकता
औरंगाबाद : लॉकडाऊननंतर जीवनशैलीत व वैचारिक बदल घडत आहेत. बदललेल्या जीवनशैलीनुसार ग्राहकांना आणखी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक आपले गृहप्रकल्प उभारत आहे. औरंगाबाद शहर आता स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने शहरात व आसपासच्या परिसरात आलिशान अपार्टमेंट उभारली जात आहे.
शहरात किंवा शहराच्या आसपासच्या भागात सहज फेरफटका मारला तर तुमच्या लक्षात येईल की स्मार्ट अपार्टमेंट उभारण्यात येत आहेत. भव्य सोसायट्या उभ्या राहत आहेत. एकच पण भव्य प्रवेशद्वार २४ तास सुरक्षारक्षक, संपूर्ण सोसायटीला सुरक्षा भिंत, सोसायटीतच मोकळे खेळण्याचे मैदान, फॅमिलीसाठी गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी क्लब, युवकांसाठी हेल्थ क्लब, अंतर्गत सिमेंटचे रस्ते, फुटपाथ, पायी फिरण्यासाठी विशेष व्यवस्था, छोटेशे मंदिर, पथदिवे, शुद्ध पाणी पिण्यासाठी प्रकल्प, पाण्याचे पुनर्भरण अशा अनेक सुविधा दिल्या जात आहेतच शिवाय आता लॉकडाऊननंतर आयटी क्षेत्र, खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी अन्य व्यावसायिक वर्क फ्रॉम होम करीत आहेत. यामुळे फ्लॅटमध्येच ऑफिसची सुविधा केली जात आहे. संपूर्ण बदललेल्या जीवनशैली बद्दल क्रेडाईचे उपाध्यक्ष व आर्किटेक्ट नितीन बागडीया यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या आधी बांधकाम क्षेत्राची गती मंद होती. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि लोकांना घरात राहावे लागले. त्यावेळी घराचे महत्व सर्वाना कळाले. नवरात्रीपासून घराची मागणी वाढली आणि बांधकाम क्षेत्राने एकदम गती घेतली. '''''''' घरी रहा, सुरक्षित रहा'''''''', वर्क फ्रॉम होममुळे स्वतःच्या हक्काच्या घराची आवश्यकता वाटू लागली. जे भाडेकरू होते त्यांना स्वतःचे घर पाहिजे होते. तर ज्यांच्याकडे स्वतःचे घर होते त्यांना मोठे घर, हवेशीर घर पाहिजे होते. घराच्या बाबतीत प्रत्येक जण अपग्रेड होत आहे. याची प्रचिती नामांकित बांधकाम व्यावसायिकांकडील फ्लॅट, रोहाऊसच्या मागणीवरून लक्षात येत आहे.
जे लोक दाटीवाटीच्या वसाहतीत राहतात, त्यांना आता स्वतंत्र, मोकळे घर हवे आहे. जे लोक वन बीएचके फ्लॅटमध्ये राहतात त्यांना आता टू बीएचके फ्लॅट खरेदी करायचा आहे. ज्यांच्याकडे टू बीएचके फ्लॅट आहे ते थ्री बीएचके फ्लॅट खरेदी करीत आहेत. जे बंगल्यात राहतात. त्यांना एकटे पडल्यासारखे वाटत आहे, ते आता भव्य टाऊनशीपमध्ये राहण्यास येत आहेत. यामुळे फोर बीएचके तसेच फाईव्ह बीएचके फ्लॅटची मागणी वाढते आहे. तसेच आता लोकांना फ्लॅटमध्ये एक गेस्ट रूम असावी, मोठी बाल्कनी असावी, टेरेस असावे, फ्लॅटमध्ये ऑफिससाठी छोटी जागा असावी अशा विचाराने नवीन फ्लॅट खरेदी केले जात आहेत.
चौकट
थ्री टायर सिटीला पसंती
कोरोनामुळे मुंबई, पुण्यापेक्षा औरंगाबाद सारख्या थ्री टायर सिटीत घर खरेदीकडे कल वाढल्याचे फ्लॅटच्या होणाऱ्या बुकिंग वरून लक्षात येत आहे. कारण मोठ्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होता. वाहतुकीची मोठी वर्दळ, सतत वाहतूक जाम, ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे आता पुणे, मुंबईकडे कल कमी झाला आहे.
चौकट
नितीन बागडीया यांनी सांगितले की, लॉकडाऊनपूर्वी लोक सोने, शेअर बाजरात गुंतवणूक करत असत. कारण बांधकाम क्षेत्रात मंदी होती. पण लॉकडाऊननंतर परिस्थिती बदलली. आता प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक वाढली आहे. त्यात घर खरेदीवर केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या विविध सवलतीचा फायदा ग्राहक घेत आहे. यामुळे शहरात व शहराबाहेर बांधकामाची गती वाढली आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन गृह प्रकल्प उभारले जात आहेत.