जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस
By Admin | Updated: August 21, 2015 00:40 IST2015-08-21T00:32:53+5:302015-08-21T00:40:43+5:30
उस्मानाबाद : बुधवारी उस्मानाबादसह लोहारा, तुळजापूर, उमरगा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पावसामुळे काही ठिकाणी सिमेंट बांध तसेच जलयुक्त शिवार

जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस
उस्मानाबाद : बुधवारी उस्मानाबादसह लोहारा, तुळजापूर, उमरगा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पावसामुळे काही ठिकाणी सिमेंट बांध तसेच जलयुक्त शिवार अंतर्गत तयार केलेल्या नाल्यांमध्ये काही प्रमाणात पाणी साचले असले तरी जिल्ह्याला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२.९७ मिमी पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद तालुक्यात १५.२५ मिमी सरासरी पावसाची नोंद असून, उस्मानाबाद शहरात १२ मिमी तर उस्मानाबाद ग्रामीणमध्ये ३ मिमी पाऊस झाला आहे. मंडळनिहाय पाऊस पाहिला असता, तेर ८, ढोकी ७, बेंबळी १०, पाडोळी १८, केशेगाव ६ तर जागजी मंडळामध्ये ५८ मिमी पावसाची नोंद झाली होती. तुळजापूर तालुक्यात गुरुवारी सकाळपर्यंत १७.१४ मिमी पाऊस झाला. यात तुळजापूर ९, सावरगाव ८, जळकोट १२, नळदुर्ग ४, ईटकळ ३, मंगरूळ २० तर सलगरा मंडळात ६४ मिमी पाऊस झाला आहे. उमरगा तालुक्यात १३.६० मिमी पावसाची नोंद असून, उमरगा शहरात १० मिमी, मुरूम १५, नारंगवाडी १९, मुळज ७ तर दाळींब मंडळामध्ये १७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोहारा तालुक्यात दमदार पाऊस झाला. लोहारा मंडळात ४५ मिमी, माकणी २६, जेवळी ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यातही सर्वदूर पाऊस झाला असला तरी ग्रामीण भागात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. कळंब मंडळात २६, ईटकूर ३, येरमाळा ८, गोविंदपूर ८, शिराढोण १० तर मोहा मंडळात १८ मिमी पाऊस झाला आहे. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरग्यासह लोहारा परिसरात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असली तरी भूम-परंडा-वाशी परिसरात गुरुवारीही रिमझिम पाऊस झाला. भूम, माणकेश्वर व वालवड मंडळात प्रत्येकी दोन मिमी पाऊस झाला असून, ईट, अंबी मंडळ कोरडे आहेत. वाशी तालुक्यातही वाशी मंडळात ११ मिमी पावसाची नोंद असून तेरखेडा आणि पारगाव मंडळाकडे पावसाने पाठ फिरविली होती. परंडा शहरात १५ मिमी पाऊस झाला असला तरी अनाळा, सोनारी आणि आसू मंडळात पावसाचा टिपूसही नव्हता. जवळा बु. मध्ये भूरभूर होती. येथे केवळ दोन मिमी पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथे गुरूवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास झालेल्या पावसादरम्यान वीज पडून एक बैल व गाय जागीच ठार झाली. गुरूवारी सायंकाळी सहा वाजता रिमझिम पावसाला सुरूवात झाली. हिप्परगा रवा येथे तर विजांच्या कडकडाटासह जवळपास पंधरा मिनिटे पाऊस पडला. पावसादरम्यान शेतकरी विलास पाटील व सुकसेन गिराम हे दोघे जनावरे गावाकडे घेवून येत होते. याचवेळी वीज कोसळल्याने दोन्ही जनावरांचा मृत्यू झाला.