पोलीस दलातील आदर्श ‘दिनकर’
By Admin | Updated: December 1, 2014 00:50 IST2014-12-01T00:30:54+5:302014-12-01T00:50:58+5:30
शिरीष शिंदे , बीड पूर्वी पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात आदर व दशहत असायची. सद्य स्थितीला काही पोलिसांच्या असभ्य वर्तणुकीमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळत चालली आहे.

पोलीस दलातील आदर्श ‘दिनकर’
शिरीष शिंदे , बीड
पूर्वी पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात आदर व दशहत असायची. सद्य स्थितीला काही पोलिसांच्या असभ्य वर्तणुकीमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळत चालली आहे. मात्र, उपअधीक्षक दिनकर शिंदे यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे आजही पोलीस दलावर सर्वसामान्यांचा विश्वास आहे. त्यांनी आपली कारकीर्द ३० नोव्हेंबर रोजी पूर्ण केली. वयाच्या ५८ व्यावर्षी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या निमित्त ‘लोकमत’ने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
दिनकर शिंदे हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरपासून जवळच असलेल्या वाखला गावचे. तरूणपणी त्यांच्या गावात फौजदार कुलकर्णी येत असत़ दारुच्या अड्ड्यावर थेट घुसून आरोपींना मारत बाहेर काढत असत. त्यामुळे मनामध्ये पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा निर्माण झाली. योगायोगाने राज्य सरकाने महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनर्तंगत फौजदार पदासाठी परिक्षेद्वारे भरती जाहीर केली. पहिल्याच परिक्षेत ते उत्तीर्ण झाले़
प्रशिक्षणार्थी फौजदार म्हणून पहिली नेमणूक बीड जिल्ह्यातच मिळाली. त्यानंतर औरंगाबाद येथे नियुक्ती मिळाली. तेथे काही वर्ष काम केल्यानंतर जालना येथील एन्टी करप्शन युनिट येथे निरिक्षक म्हणून पदभार सांभाळला. चार वर्षात जवळपास वीस लाचखोरांना गजाआड करुन शिक्षाही मिळवून दिल्या.
त्या पुढील काळात नांदेड, लातूर, औरंगाबाद येथे कार्य केले. त्यांच्या उत्तम कार्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली. ३६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना आर.वाय. देशपांडे, रंजन मुखर्जी, संजीव दयाल, विश्वास नांगरे पाटील, अशितोष डुंबरे व बीडचे तत्कालिन अधीक्षक दत्तात्रय मंडलिक, विद्यमान अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी या सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले, असे शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यांनी आतापर्यंत ४५० बक्षिसे प्राप्त झाली. जानेवारी २०११ मध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. तसेच केज उपविभागाचा पदभारही दिला. या काळात काळेगाव बॉम्ब स्फोट झाला. याचा ‘आवाज’ दिल्ली पर्यंत गेला होता.४
एनआयए व एटीएस पथक बीडमध्ये तळ ठोकून होते. या प्रकरणाचा तपास शिंदेच्या मार्गदर्शनाखाली लावला गेला. न्यायालयाने प्रकरणी आरोपी गिरी यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून बोगस कागदपत्राच्या आधारे कर्ज घेणाऱ्या विरुद्ध कारवाई करत गुन्हे दाखल केले. परळी व धारुर तालुक्यांत अफुची लागवड करणारे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणाचा अचूकपणे तपास करुन शेती करण्यास भाग पाडणाऱ्या, व्यापार करवून घेणाऱ्या व त्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध कारवाई केली. हा विषय देशपातळीवर गाजला होता. आफूची शेतीचा गंभीर प्रकार समोर आल्याने नार्कोटिक्स विभागाने अंमली पदार्थाची लागवडी माहिती तात्काळ समोर येण्यासाठी महाराष्ट्रावर लक्ष ठेवणारे सॅटेलाईट बसविण्यात आले आहेत. यासर्वांचे श्रेय तपासी अधिकाऱ्यांसह दिनकर शिंदे यांना द्यावे लागेल. ३५ वर्षांच्या कारर्किदीत शिंदे यांच्यावर कोणातही डाग लागला नाही किंवा कोणत्याही प्रकरणाची डिपार्टमेंटल चौकशी झाली नाही.