मॉडेल कॉलेजची मदार कंत्राटी शिक्षकांवर
By Admin | Updated: July 21, 2014 00:34 IST2014-07-21T00:02:12+5:302014-07-21T00:34:49+5:30
औरंगाबाद : ‘मॉडेल कॉलेज’च्या माध्यमातून समाजाच्या मूलभूत व आर्थिक गरजा पूर्ण करणारा अभ्यासक्रम शिकविला जावा, केंद्र सरकारच्या या उद्देशालाच विद्यापीठामार्फत हरताळ फासला जात आहे.

मॉडेल कॉलेजची मदार कंत्राटी शिक्षकांवर
औरंगाबाद : दर्जेदार शिक्षण देत असताना ‘मॉडेल कॉलेज’च्या माध्यमातून समाजाच्या मूलभूत व आर्थिक गरजा पूर्ण करणारा अभ्यासक्रम शिकविला जावा, केंद्र सरकारच्या या उद्देशालाच विद्यापीठामार्फत हरताळ फासला जात आहे.
घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजसाठी एका वर्षाकरिता कंत्राटी तत्त्वावर ७ प्राध्यापकांची भरती केली जाणार असून, त्यासाठी उद्या सोमवारी विद्यापीठामध्ये मुलाखती होणार आहेत. एकीकडे दर्जेदार उच्चशिक्षण देण्यासाठी मॉडेल कॉलेजची स्थापना केली जाते, तर दुसरीकडे या कॉलेजमध्ये अध्यापनाचे कार्य करणारे शिक्षक केवळ एक वर्ष कालावधीसाठीच नियुक्त केले जातात. अशा कंत्राटी शिक्षकांकडून या कॉलेजमध्ये शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा कितपत राखला जाईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशभरात मॉडेल कॉलेजची सुरुवात करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी घेतला. त्यानुसार मराठवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत हिंगोली येथे ‘मॉडेल कॉलेज’ सुरू करण्यात आले. मॉडेल कॉलेज हा एक कायमस्वरूपी प्रकल्प असून, जिल्ह्याचा शैक्षणिक दर मुख्य प्रवाहात आणणे हा त्यामागचा हेतू आहे. या कॉलेजचे व्यवस्थापन विद्यापीठाकडे आहे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणात अडकून न राहता कौशल्यपूर्ण आणि व्यवसायाभिमुख शिक्षण घ्यावे, हा या प्रकल्पाचा हेतू आहे. असे असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे उद्या २१ व २२ जुलै रोजी मॉडेल कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक, क्रीडा मार्गदर्शक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि वाणिज्य या ७ विषयांसाठी केवळ चालू शैक्षणिक सत्रापुरतेच मर्यादित (तात्पुरत्या स्वरूपात) सहायक प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. पहिल्या दिवशी २१ जुलै रोजी सहायक प्राध्यापकांसाठी, तर दुसऱ्या दिवशी २२ जुलै रोजी शिक्षकेतर पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या कक्षामध्ये सकाळी १० वाजेपासून मुलाखतीचा हा कार्यक्रम चालणार आहे. मॉडेल कॉलेज हा एक कायमस्वरूपी प्रकल्प मानला जातो. या कॉलेजसाठी पूर्णवेळ व गुणवत्ताप्रधान प्राध्यापक निवडले जावेत, असा सूर विद्यार्थी संघटनांमध्ये उमटला आहे.