एटीएमची हेराफेरी करून फसविले
By Admin | Updated: August 13, 2014 01:07 IST2014-08-13T00:45:53+5:302014-08-13T01:07:19+5:30
लातूर : एटीएम कार्डची अदलाबदल करून एकाला २९ हजारांना चुना लावल्याची घटना सोमवारी उदगीर शहरातील शिवाजी चौकातील एसबीआय एटीएममध्ये घडली.

एटीएमची हेराफेरी करून फसविले
लातूर : एटीएम कार्डची अदलाबदल करून एकाला २९ हजारांना चुना लावल्याची घटना सोमवारी उदगीर शहरातील शिवाजी चौकातील एसबीआय एटीएममध्ये घडली. याबाबत एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध उदगीर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उदगीर शहरातील तिरुपती सोसायटीतील रंगराव ग्यानोबा मोरे हे मुलाला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी उदगीर शहरातील शिवाजी चौकातील एसबीआय एटीएममध्ये सोमवारी ९.४५ वाजण्याच्या सुमारास गेले होते. एटीएम मशीनवर ३ ते ४ वेळा प्रयत्न करूनही पैसे ट्रान्सफर होऊ शकले नाहीत.
यावेळी त्यांच्या शेजारी असलेल्या एका व्यक्तीने पैसे ट्रान्सफर करून देतो म्हणून रंगराव मोरे यांच्या जववळील एटीएम कार्ड घेतले व त्यांना तीन ते चार वेळा एटीएम कोड दाबण्यास सांगितले. पण पैसे ट्रान्सफर झाले नाहीत. दरम्यान, ‘त्या’ व्यक्तीने मोरे यांचे एटीएम कार्ड जवळच ठेवून घेतले व त्याच्या जवळील एटीएम कार्ड देऊन निघून गेला. पण काही वेळातच मोरे यांच्या ६०२०५३९२२६६९ या बँक खाते क्रमांकातून २९ हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला. एटीएम कार्डची अदलाबदल करून ‘त्या’ अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याचे लक्षात आले, असे उदगीर ग्रामीण पोलिसात रंगराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ४०६, ४२० भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)