मोकाट कुत्र्यांचा उच्छाद
By Admin | Updated: April 30, 2015 00:35 IST2015-04-30T00:23:34+5:302015-04-30T00:35:19+5:30
जालना : जिल्ह्यात अनेक ठिकाणी कुत्र्यांचा मोठा उच्छाद झाला असून काही ठिकाणी कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.

मोकाट कुत्र्यांचा उच्छाद
जालना : जिल्ह्यात अनेक ठिकाणी कुत्र्यांचा मोठा उच्छाद झाला असून काही ठिकाणी कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. घनसावंगी तालुक्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात यापूर्वी एका बालकाचा बळी गेला, तर एक बालक गंभीर जखमी झाला आहे. जालना शहरात चौकाचौकात कुत्र्यांचे रात्री-अपरात्री अंधारात टोळके ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर धावून जात असल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत.
जालना शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबरच कुत्र्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. काहीजण कुत्र्यांचे पालन करून त्यांना पट्टा बांधतात. विविध जातींची कुत्रे खरेदी करण्याचाही काही जणांचा छंद असतो. याशिवाय शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक आहे. चौकाचौकात २०-२५ कुत्र्यांचा समूह रात्री १० नंतर एकत्र आलेला असतो.
पथदिवे बंद असल्याने शहर गेल्या दोन वर्षांपासून अगोदरच अंधारात आहे. त्यामुळे सायंकाळनंतर जवळपास ठिकाणी वाहनांच्या दिव्यांशिवाय प्रकाश नसतो. अशावेळी रस्त्यात असलेल्या कुत्र्यांचे टोळके तेथून ये- जा करणाऱ्या वाहनधारकांवर धावून जातात. कुत्र्यांचा पिच्छा सोडविण्याच्या वाहनधारकांच्या प्रयत्नात काहीवेळा कुत्रे वाहनांखाली सापडतात. त्यामुळे वाहन घसरून अपघाताच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. मात्र कुत्र्यांमुळे वाहन घसरल्याची नोंद कुठेही नाही.
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या अंदाजित चार हजार आहे. परंतु मोकाट कुत्र्यांच्या वाढीवर नियंत्रण म्हणून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया नगरपालिकेमार्फत करण्यात आलेली नाही. वास्तविक शासनाने मोकाट कुत्र्यांची जननसंख्या रोखण्यासाठी त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नगरपालिकेने यासबंधी कोणतीच कार्यवाही केलेली नाही. एकीकडे रस्ते अंधारात आणि दुसरीकडे मोकाट कुत्र्यांचा त्रास अशा अडचणीत सर्वसामान्य जालनेकर सापडले आहेत.
कन्हैय्यानगर चौक, देहेडकरवाडी, माळीपुरा, मुक्तेश्वर प्रवेशद्वार, कसबा, नूतन वसाहत, तट्टूपुरा, इंदिरानगर, संजयनगर, गांधीनगर, रामनगर, लक्कडकोट, मस्तगड, रेल्वेस्टेशन परिसर, भालेनगरी, बडीसडक, लालबाग, टाऊनहॉल, कडबी मंडी, दु:खीनगर, फुलबाजार, सराफा, काद्राबाद, कचेरी रोड, राजपूतवाडी, माऊलीनगर, यशवंतनगर, अयोध्यानगर, सत्कार्यनगर, समर्थनगर, शिवनगर, मंमादेवीनगर, गोपाळपुरा, भावसारगल्ली, करवानगर, आझाद मैदान परिसर, पोलिस कॉलनी, मंठा चौफुली, पावरलूम, मोदीखाना, ढवळेश्वर, म्हाडा कॉलनी, प्रियदर्शनी कॉलनी, नॅशनल नगर, चंदनझिरा, सुुंदरलालनगर, सुखशांतीनगर, चौधरीनगर, घायाळनगर, रहेमानगंज चौक, जुना मोंढा परिसर, दवामार्केट इत्यादी भागात कुत्र्यांचे टोळके आढळते. (प्रतिनिधी)
भोकरदन शहरात शिवाजीनगर, बाजारपट्टी, म्हाडा कॉलनी, रिकामटेकडी, आलापूर इत्यादी परिसरात मोकाट कुत्र्यांचा संचार आहे. कुत्र्यांनी आतापर्यंत अनेकांना चावा घेतला. विशेषत: बच्चेकंपनीचा त्यात मोठा समावेश आहे. त्यामुळे कुत्र्यांचा सर्वसामान्यांना त्रास होत आहे.
४बदनापूर शहरातही मोकाट कुत्र्यांचा मुक्तसंचार असतो. विशेषत: रात्रीच्या सुमारास जालना-औरंगाबाद महामार्गावरही कुत्र्यांचे टोळके असते.वाहनांच्या अपघातात काही कुत्र्यांचा मृत्यू झालेला आहे.
४अंबड शहरात विविध चौकांमध्येही मोकाट कुत्र्यांचा संचार असतो. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा मोठा त्रास होतो. अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
४जाफराबाद शहर व परिसरातही मोकाट कुत्र्यांचा उच्छाद आहे. या कुत्र्यांचा पादचारी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. या प्रकाराकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे. परतूर, मंठा शहरातही मोकाट कुत्र्यांचा त्रास आहे.
घनसावंगी तालुक्यात अनेक गावांमध्ये मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. पादचाऱ्यांसह लहान मुलांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे. तीर्थपुरी येथे काही दिवसांपूर्वी कुत्र्यांच्या हल्ल्यात महेश संतोष जाधव हा आठ वर्षीय बालक ठार झाला. यापाठोपाठ भारडी येथे अहमद रशीद पठाण या तीन वर्षीय बालकावरही कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्यास अधिक उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तीर्थपुरी येथील घटनेप्रकरणी ग्रामस्थांनी बंदही पाळला होता.
जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. या शस्त्रक्रियेचा खर्च न.प.ला करावा लागणार आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या किती, याची पालिकेकडे माहिती नाही. परंतु आम्ही लवकरच याबाबत उपाययोजना करू.
का.क़ मुखेडकर
उपमुख्याधिकारी
जळगाव सपकाळ परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी गाववस्तीकडे येत आहेत. बुधवारी एका हरणासह त्याचे तीन पिल्लू पाण्याच्या शोधात गाववस्तीकडे आले. परंतु मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी कुत्र्यांच्या तावडीतून हरणाच्या एका पिलाचा बचाव करून त्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. ही माहिती कौतिक सपकाळ यांनी संबंधितांना दिली. वन अधिकारी जी.एन. शिनगारे यांनी तेथे येऊन हरणाच्या पिलास ताब्यात घेतले. यावेळी कौतिक सपकाळ, मधुकर सावळे, कैलास सावळे, शामा सपकाळ, अशोक सावळे, गोविंद सावळे आदी उपस्थित होते.