मोबाईलचे नेटवर्क होणार जाम
By Admin | Updated: July 14, 2014 01:04 IST2014-07-14T00:39:35+5:302014-07-14T01:04:04+5:30
औरंगाबाद : शहरातील मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे ९ कोटी रुपयांचा कर थकल्यामुळे उद्या १४ रोजी दुपारनंतर महत्त्वाचे टॉवर्स ‘सील’ (कुलूप ठोकणे) करण्यासाठी महापालिका मोहीम हाती घेणार आहे.

मोबाईलचे नेटवर्क होणार जाम
औरंगाबाद : शहरातील मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे ९ कोटी रुपयांचा कर थकल्यामुळे उद्या १४ रोजी दुपारनंतर महत्त्वाचे टॉवर्स ‘सील’ (कुलूप ठोकणे) करण्यासाठी महापालिका मोहीम हाती घेणार आहे.
६ प्रभागांमध्ये एकाचवेळी ती मोहीम सुरू करण्यात येणार असल्यामुळे मोबाईलधारकांचे ‘नेटवर्क’ जाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनधिकृत वसाहतींमधील अनधिकृत इमारतींवर अनधिकृत टॉवर्स उभारण्यात आले आहेत. इमारत आणि टॉवर दोन्हीही अनधिकृत त्यामुळे दंड लावण्यात येणार आहे. ५० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंतचा कर एका टॉवरकडे निघू शकेल, असे अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले. मनपाचे उत्पन्न त्यातून किती वाढले, आदेश देऊनही कारवाईस विलंब का होत आहे, टॉवर्स कोणत्या वसाहतींमध्ये आहेत, किती टॉवर्स अधिकृत आहेत, आजवर किती उत्पन्न मिळाले, यावरून नगरसेवक आणि प्रशासनात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत.
प्रत्येक वॉर्डात ४
महापालिकेच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षभरात सुमारे १०० अनधिकृत टॉवर्सची भर पडली आहे. अधिकाऱ्यांच्या चिरीमिरीच्या नेटवर्कमुळे हे टॉवर्स उभे राहिले असून, अनधिकृत वसाहती, खुल्या भूखंडावर ते टॉवर्स उभे आहेत. शासनाने ३ लाख रुपयांऐवजी ५० हजार रुपये प्रतिटॉवर शुल्क आकारण्याची मुभा दिल्यामुळे मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. प्रत्येक वॉर्डात ३ ते ४ टॉवर्सचे प्रमाण येते.
४ जीचे १२५
फोर-जी नेटवर्क जानेवारी २०१५ मध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी १२५ टॉवर्सची भर शहरात पडणार आहे. खुले भूखंड, स्मशानभूमी, उद्यानांत ते टॉवर उभारण्याची परवानगी मनपाने दिली आहे. ५५० टॉवर्स शहरात जानेवारी २०१५ पर्यंत दिसतील.
गुंठेवारीत २००
गुंठेवारी वसाहतींमध्ये बांधकाम परवानगी पालिका देत नाही. तेथे टॉवर उभारणीला परवानगी कशी देते, ११९ वसाहतींमध्येच सर्वाधिक अनधिकृत टॉवर्स उभे आहेत. अंदाजे २०० टॉवर्स गुंठेवारी वसाहतींमध्ये आहेत, असे मनपाने कळविले.
साडेनऊ लाख मोबाईलधारक
ढोबळ आकडेवारीनुसार शहरात साडेनाऊ लाख मोबाईलधारक आहेत. एका मोबाईल टॉवरवर ३ ते ५ कंपन्यांचे नेटवर्क असते. एका टॉवरवरून प्रत्येक कंपनीच्या कमीत कमी ते ५०० ते जास्तीत जास्त ७०० ग्राहकांना नेटवर्कची ‘रेंज’ मिळते. त्यामुळे एका टॉवरवर साधारणत: २ हजार ५०० मोबाईलधारकांचे नेटवर्क इन व आऊट केले जाते.
वॉर्ड 099
टॉवर्स 375
अधिकृत 047
अनधिकृत 328
अधिकारी म्हणतात...
प्रत्येक कंपनीच्या महत्त्वाच्या टॉवर नेटवर्कचे साहित्य ताब्यात घेतले जाईल. उद्या १४ रोजी सकाळी पदमपुरा येथील फायरब्रिगेडच्या कार्यालयात ११.३० वा. मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक होईल. कंपन्यांनी दुपारपर्यंत कर भरणा केला, तर ठीक अन्यथा कारवाई सुरू होईल. ५ कोटी रुपयांपर्यंत कर पालिकेला तातडीने मिळण्याची शक्यता अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांनी वर्तविली.