मनसेचा मनपावर विराट मोर्चा
By Admin | Updated: July 15, 2014 00:52 IST2014-07-14T23:47:03+5:302014-07-15T00:52:26+5:30
लातूर : नागरी समस्या सोडविण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपावर सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला.
मनसेचा मनपावर विराट मोर्चा
लातूर : नागरी समस्या सोडविण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपावर सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अण्णा भाऊ साठे चौकातून सकाळी ११ वाजता निघालेला मोर्चा दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मनपावर धडकला.
लातूर शहरात कचऱ्याचे जागोजागी ढिग साचले आहेत. पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. एलबीटीमुळे व्यापारी हैराण आहेत. धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परंतु, याकडे मनपा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप मोर्चाच्या वतीने करण्यात आला.
यशवंत शाळेसमोरील शासकीय गोडावून जवळ सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे़, रिंगरोडवरुन डीपी प्लॅनप्रमाणे ज्ञानेश्वर नगरमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील वीस वर्षांपासून असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे, वैदू समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, शहरातील अनेक रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, लिकेज झालेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करावी, मनपाचे दवाखाने व शाळांची दुरवस्था थांबवावी़, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अनावरण तात्काळ करावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मनपा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर या मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांना देण्यात आले.
निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, संतोष नागरगोजे, साईनाथ दुर्गे, राजकुमार होळीकर, सुनिल मलवाड, गणेश गवारे, बालाजी जाधव, राज क्षीरसागर, पप्पू धोत्रे, शाम जाधव, फुलचंद कावळे, गीता गौड, विनोद मालू, सुनिल सौदागर, हरिओम भगत, महादेव कलमुकले, इक्रांत सय्यद, युवराज कांबळे, योगिता जानतीकर, प्रसाद स्वामी, मनोज अभंगे, अमर गिरी, महेश खोबरे, अॅड. सचिन चामले, गजानन कातळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)
कचरा, पाण्याचा प्रश्न गंभीर : बाळा नांदगावकर
लातूर शहरात कचरा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. लातूर शहराला पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिक वैतागले असून, सत्ताधारी नागरी समस्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांच्या प्रश्नांसाठी हा विराट मोर्चा काढला असल्याचे आमदार बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले. नागरी समस्यांची उकल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या पाठीशी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.