मनसेमध्येच स्वबळाची ताकद
By Admin | Updated: July 13, 2014 00:25 IST2014-07-13T00:13:39+5:302014-07-13T00:25:07+5:30
नांदेड : विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची ताकद काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना या कोणत्याही पक्षात नाही़

मनसेमध्येच स्वबळाची ताकद
नांदेड : विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची ताकद काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना या कोणत्याही पक्षात नाही़ दरम्यान, ही ताकद असणारी एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी निवडणूक २८८ जागांवर स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती मनसेचे गटनेते आ़ बाळा नांदगावकर यांनी आज येथे दिली़
शनिवारी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या़ यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, संपर्क प्रमुख उदय सामंत, माजी आ़ रोहिदास चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रकाश मारावार, विनोद पावडे, अॅड़ दिलीप ठाकूर, मॉन्टीसिंग जहागिरदार, अजय सरसर आदींची प्रमुख उपस्थिती होती़ लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार जिंकू शकला नाही़ परंतु आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लोक आम्हाला पसंती देतील, असा विश्वास आ़नांदगावकर यांनी व्यक्त केला़ लातूरपासून मराठवाडा दौऱ्यास सुरूवात झाली आहे़ दौऱ्यामध्ये निवडणूक तयारी, पक्ष संघटन स्थिती आणि उमेदवार चाचपणी सुरू असून हा सर्व अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले़
नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये मनसेला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ मुखेड, बिलोली, कंधार, लोहा तालुक्यात मनसेने आपले अस्तित्व निर्माण केलेले आहे़ आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता लोहा - कंधार मतदारसंघासाठी पाच, नांदेड उत्तरकरीता चार आणि नांदेड दक्षिण मतदारसंघाकरीता आठ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून येत्या काही दिवसामध्ये उमेदवारांची निवड केली जाईल, असेही त्यांनी सांगितले़
मनसेच्या ब्ल्यू प्रिंटवर वारंवार टीका होत आली आहे़ मात्र येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा ब्ल्यू प्रिंट घेवून आम्ही येणार आहोत, असे आ़नांदगावकर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)