मनपाचे विद्यार्थी गणवेशापासून वंचित
By Admin | Updated: September 8, 2014 00:35 IST2014-09-08T00:12:04+5:302014-09-08T00:35:53+5:30
औरंगाबाद : शहरात १,५०० कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचा गवगवा करणाऱ्या महापालिकेने विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवले आहे.

मनपाचे विद्यार्थी गणवेशापासून वंचित
औरंगाबाद : शहरात १,५०० कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचा गवगवा करणाऱ्या महापालिकेने विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवले आहे. गेल्या आठवड्यातच ११२ कोटी रुपयांच्या पथदिव्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.
तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना गणवेश मिळलेले नसून ३४ लाख रुपयांची खर्चमंजुरी मनपाने दिलेली नाही. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानातील १२ हजार विद्यार्थ्यांना एकेक गणवेश मिळाला. उर्वरित ८ हजार विद्यार्थी मात्र गणवेशाची प्रतीक्षा करीत आहेत. १५ आॅगस्ट रोजी मनपा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत या दिशेने पालिका दरवर्षी निर्णय घेते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत बीपीएलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळत असत. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत. यासाठी पालिकेच्या फंडातून तरतूद करण्याचा निर्णय घेतला; परंतु तरतूद केलेली रक्कम कागदावरच राहिल्यामुळे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. मनपा शाळेतील २० टक्के विद्यार्थी ‘ढ’ राहिले आहेत. ‘ढ’ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली होती. ते विद्यार्थी हुशार झाले नाहीत तर शिक्षकांच्या वेतनवाढी कायमस्वरूपी थांबविण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांनी दिले होते. मात्र, आयुक्त जाताच तो आदेश मागे घेण्यात आला आहे. वेतनवाढ थांबविण्यात आलेल्या शिक्षकांना पुन्हा वेतनवाढ देण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी ए.एम. शेख यांनी सांगितले. जे विद्यार्थी ‘ढ’ राहिले आहेत. त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली असल्याचे त्यांनी सांगितले.