आमदारांनी सुचविली दहा कोटींची कामे
By Admin | Updated: July 22, 2014 00:36 IST2014-07-22T00:21:01+5:302014-07-22T00:36:37+5:30
औरंगाबाद : विधानसभेच्या येत्या निवडणुकीपूर्वी चालू आर्थिक वर्षाचा सर्व विकास निधी खर्च करण्याचे प्रयत्न आमदारांकडून सुरू आहेत.

आमदारांनी सुचविली दहा कोटींची कामे
औरंगाबाद : विधानसभेच्या येत्या निवडणुकीपूर्वी चालू आर्थिक वर्षाचा सर्व विकास निधी खर्च करण्याचे प्रयत्न आमदारांकडून सुरू आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील आमदारांनी प्रशासनाला तब्बल ९ कोटी ८३ लाख रुपयांची विविध कामे सुचविली आहेत. आणखी तीन कोटी रुपयांचा विकास निधी शिल्लक असून, त्यातील कामेही लवकरच सुचविली जाण्याची शक्यता आहे.
आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी राज्य शासनातर्फे दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधी दिला जातो. २०१४-१५ वर्षासाठी जिल्ह्यातील ९ विधानसभा सदस्यांना १८ कोटी रुपयांचा विकास निधी मिळालेला आहे. त्यातील सुमारे ५ कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम ही गेल्या वर्षीच्या अर्धवट कामांवर खर्च होणार आहे. उर्वरित १२.६९ कोटी रुपयांपैकी आतापर्यंत तब्बल ९.८३ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव या आमदारांनी जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत.
२.८६ कोटी रुपयांचा निधी शिल्लक
एप्रिलपासून आतापर्यंत तीन महिन्यांत हे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या विकास निधीतील आणखी केवळ २.८६ कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा निधी खर्च करण्याचा आमदारांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आमदारांकडून जिल्हा प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर कामांचे प्रस्ताव प्राप्त होत आहेत.
येत्या महिनाभरात या निधीतून विविध कामे सुचविली जाणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी एच. बी. अहिरे यांनी सांगितले की, आमदारांनी विकासकामे सुचविल्यानंतर प्रशासनातर्फे त्याला मंजुरी दिली जाते. त्या- त्या वर्षाचा निधी खर्च करण्यासाठी त्याच वर्षात कामे सुचवून मंजुरी घ्यावी लागते.
ही मंजुरी घेतल्यानंतर ते काम करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असते. त्यात केव्हाही हे काम केले जाऊ शकते. आतापर्यंत आ. संजय शिरसाट यांनी चालू वर्षात ५५ लाख, संजय वाघचौरे यांनी ९५ लाख, हर्षवर्धन जाधव यांनी १ कोटी ६९ लाख, कल्याण काळे यांनी १ कोटी २ लाख, आर. एम. वाणी यांनी १ कोटी ३४ लाख, प्रशांत बंब यांनी १ कोटी २० लाख, प्रदीप जैस्वाल यांनी १ कोटी ३१ लाख, अब्दुल सत्तार यांनी १ कोटी ७६ लाख रुपयांची कामे सुचविली आहेत.