खुलताबाद: खुलताबाद- गंगापूर खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याच्या मुद्यावर आ. प्रशांत बंब आक्रमक झाले असून १ सप्टेंबरपासून मुख्यालयी राहण्यास न आल्यास वेतनवाढ रोखणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. ८ सप्टेंबर २०२२ पासून खुलताबाद- गंगापूर तालुक्यातील १२५३ मुख्यालयी न राहणा-या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे. तीन वर्षांपासून या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद असला तरी मुख्यालयी राहण्यासाठी कुणीच तयार नसल्याचे चित्र असल्याचे चित्र आहे.
सोमवारी दि ४ रोजी खुलताबाद तालुक्यातील बाजार सांवगी येथे महसूल विभागाच्या महाराजस्व अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलतांनी मुख्यालयी राहण्याच्या मुद्यावर बाजार सांवगी येथील ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांना उभे करत मुख्यालयी राहतात का? असे विचारत हजेरी घेतली. दरम्यान, शिक्षकांना मुख्यालयी राहावेच लागणार असून १ सप्टेंबर पासून मुख्यालयी राहण्यास न आल्यास एक वेतनवाढ रोखणार असल्याचे ठामपणे सांगितले.
यावेळी ग्रामस्थांशी बोलतांना आ. प्रशांत बंब म्हणाले की, मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षक, ग्रामसेवक यांचे पत्र बीडीओ यांना द्यावेत व त्यांच्यावर शिस्तभंगाची व नोकरीवरून काढून टाकण्याची मागणी त्या तक्रारीत करा, असे आवाहन त्यांनी केले. नोकरदार नोकरी भेटतांना भारत-पाकिस्तान सीमेवर भेटली तरी जायला तयार आहे, असे म्हणतो प्रत्यक्षात नोकरी भेटली तर काम नाही करायचे, ही गंभीर गोष्ट असल्याचे आ. प्रशांत बंब यांनी यावेळी म्हटले आहे.
आधी घरभाडे भत्ता बंद, आता वेतनवाढ बंदची नोटीसदरम्यान, खुलताबाद- गंगापूर तालुक्यातील मुख्यालयी न राहणाऱ्या तब्बल १२५३ शिक्षकांचा तीन वर्षापूर्वी घरभाडे भत्ता बंद केलेला आहे. त्यानंतरही मुख्यालयी राहत नसल्याने या शिक्षकांना तीन वर्षांसाठी एक वार्षिक वेतनवाढ बंद करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावली आहे. यामुळे गंगापूर- खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांत एकच खळबळ उडाली आहे.