एमजेपीची यंत्रणा कोलमडली !
By Admin | Updated: April 20, 2016 23:42 IST2016-04-20T23:19:41+5:302016-04-20T23:42:30+5:30
लातूर : जलपरीच्या ५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्यास यंत्रणा सज्ज असल्याचा मंगळवारी केलेला दावा फोल ठरला असून,

एमजेपीची यंत्रणा कोलमडली !
लातूर : जलपरीच्या ५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्यास यंत्रणा सज्ज असल्याचा मंगळवारी केलेला दावा फोल ठरला असून, पाण्याच्या प्रेशरने टँकर पॉर्इंटकडे जाणारी मोठी पाईपलाईन निसटली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत प्रगती कन्स्ट्रक्शनमार्फत पाईपलाईनचे काम सुरू आहे. प्रारंभीच्या वेळीच पाईप निसटल्याने टँकर पॉर्इंटवरून पाणी भरता आले नाही.
जलपरीतील ३५ वॅगनमधील पाण्याने विहीर तुडूंब भरली. या ३५ वॅगन रिकाम्या होण्यास फक्त दोन तासांचा कालावधी लागला. मात्र विहिरीतील पाणी पंपाद्वारे टँकर पॉर्इंटपर्यंतच्या पाईपलाईनने सुरू करताच प्रेशरने मोठा पाईप निसटला. त्यामुळे टँकर पॉर्इंटवरून पाणी आर्वी जलशुद्धीकरण केंद्राकडे नेण्यास ही यंत्रणा कुचकामी ठरली. परिणामी, विहिरीतील पाणी टँकरद्वारे जलशुद्धीकरण केंद्राकडे नेण्यासाठी विलंब झाला. जर पाईप निसटला नसता तर ६ तासांत विहिरीतील पाणी उचलता आले असते. शिवाय, उर्वरित १५ वॅगनमधील पाणी विहिरीत टाकण्याच्या प्रक्रियेला व्यत्यय आला. विहीर ३५ वॅगननेच भरल्यामुळे अन्य १५ वॅगनमधील पाणी उतरविण्यासाठी जलपरीला रेल्वेस्थानकातच थांबावे लागले. सकाळी ७.५५ वाजता वॅगनमधील पाणी उतरविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. पुढील दोन तासांत ३५ वॅगनमधील पाणी उतरविण्यात आले. त्यात विहीर तुडूंब भरली. परंतु, इकडे निसटलेला पाईप जोडण्यातही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व प्रगती कन्स्ट्रक्शनला अपयश आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाईप जोडण्याची प्रक्रियाच सुरु होती.
रेल्वेस्थानकालगत असलेली एस.आर. देशमुख यांची विहीर व आर्वी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची पाईपलाईन अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. दोन कि.मी. अंतरापर्यंतचे पाईप टाकण्यात आले आहेत. त्यातील एक कि.मी. अंतराची जोडणी झाली असून, ती बुजविण्यात आली आहे. उर्वरित एक कि.मी. अंतरातील पाईप उघड्यावरच आहेत. शिवाय, पुढील एक कि.मी. अंतराच्या पाईपचा पुरवठा अद्याप झालेला नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रगती कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले आहे. या कन्स्ट्रक्शनने काल मंगळवारीच यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला होता. मात्र तो फोल ठरला असून, सरासरी हजार मीटर अंतराच्या आसपास असलेली ही पाईपलाईन निसटली. त्यामुळे रेल्वेचा तब्बल चार तासांचा वेळ वाया गेला. (प्रतिनिधी)
रेल्वे वॅगनमधील पाणी उतरवून विहिरीपर्यंत नेण्यासाठी ८५० मीटरची पाईपलाईन आहे. परंतु, विहिरीत साठविलेले पाणी टँकरमध्ये भरण्यासाठी आठ पॉर्इंट करण्यात आले आहेत. त्या पॉर्इंटकडे जाणारा मोठा पाईप निसटला. हा पाईप जोडण्याचे काम सध्या सुरूच आहे. रात्री उशिरापर्यंत पाईप जोडला गेला नव्हता.
४परिणामी, विहीर ३० ते ३५ वॅगनमधील पाण्याने भरली. त्यामुळे प्रशासनाने विहिरीतील पाणी मोठ्या टँकरद्वारे जलशुद्धीकरण केंद्राकडे नेले. तयार केलेल्या ८ पॉर्इंटवरून पाणी टँकरमध्ये भरता आले नाही. परिणामी, विहिरीतील पाणी टँकरने उचलावे लागले. त्यामुळे मोठा विलंब झाला.
१५ वॅगनमधील पाणी खाली करण्यासाठी विहिरीतील पाणी उपश्याची वाट पहावी लागली. ८ वाजून २० मिनिटांनी वॅगन खाली करण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु, प्रस्तुत मोठा पाईप निसटल्यामुळे ४.४५ वाजेपर्यंत वॅगनमधील पाणी उतरविण्यासाठी वेळ खर्ची झाला. जर पाईप निसटला नसता तर ४ तासांतच वॅगन रिकामी झाली असती.
आर्वी जलशुद्धीकरण केंद्र ते एस.आर. देशमुख यांच्या विहिरीचे अंतर तीन किलोमीटरचे आहे. या विहिरीवर बारा पंप बसले आहेत. विहीर ते आठ टँकर पॉर्इंटची पाईपलाईन प्रारंभालाच विस्कळीत झाली. शिवाय, जलशुद्धीकरण केंद्र ते रेल्वे स्थानक विहीर पाईपलाईनचे खोदकाम पूर्ण झाले आहे. दोन कि.मी. अंतरापर्यंतचे पाईप अंथरले आहेत. उर्वरित पाईप पुरवठा झाला नाही. गेल्या आठ दिवसांपासून पाईपाचा पुरवठा ठप्प आहे. त्यातच सध्या झालेले कामही अर्धवट आहे. या गोंधळातच बुधवारी टँकर पॉर्इंटपर्यंतचा मोठा पाईप निसटला. त्यामुळे विहिरीतील पाणी मनपाला टँकरद्वारे जलशुद्धीकरण केंद्राकडे न्यावे लागले. परिणामी, जलपरीला तब्बल ४ तासाने मिरजकडे उशिरा जावे लागले.
विहिरीपासून टँकर पॉर्इंटकडे जाणारा हा पाईप निसटला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत या पाईपाच्या जोडणीचे काम सुरू होते. प्रगती कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्यांनी हा पाईप जोडण्यासाठी परिश्रम घेतले. मात्र तो वेळेत बसू शकला नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने विहिरीतील पाणी टँकरद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात नेले. आठ टँकर पॉर्इंटचा मात्र हा पाईप निसटल्यामुळे फायदा झाला नाही.