बदलानंतर चुका थांबल्या
By Admin | Updated: November 19, 2014 01:00 IST2014-11-19T00:33:42+5:302014-11-19T01:00:12+5:30
औरंगाबाद : परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले. त्यानंतर परीक्षेत होणाऱ्या चुका थांबल्या

बदलानंतर चुका थांबल्या
औरंगाबाद : परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले. त्यानंतर परीक्षेत होणाऱ्या चुका थांबल्या. आता चारही जिल्ह्यांत परीक्षा सुरळीत असल्याची ग्वाही परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली. दरम्यान, बी.एस्सी.च्या सहाव्या सत्राची प्राणिशास्त्र विषयाची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार अद्याप झालेली नाही. ती उद्या बुधवारी व त्यानंतर शनिवारी असल्याचे त्यांनी सांगितले.
‘लोकमत’शी बोलताना परीक्षा नियंत्रक डॉ. गायकवाड म्हणाले की, २७ आॅक्टोबरपासून पदवी, तर अलीकडच्या आठवड्याात पदव्युत्तर परीक्षा सुरू झाल्या. सुरुवातीला केमिस्ट्रीच्या पेपर सेटच्या कोडची खातरजमा न करताच ते पेपर केंद्रावर पाठविल्यामुळे जुन्या अभ्यासक्रमाचे पेपर विद्यार्थ्यांना मिळाले. ही बाब गांभीर्याने घेत परीक्षा विभागाने कसलाही विलंब न लावता तात्काळ मेलद्वारे दुसरे पेपर केंद्रांना पाठविले. या चुका नेमक्या कशामुळे झाल्या, याची तातडीने चौकशी केली, तेव्हा परीक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार घडल्याचे लक्षात आले, त्यामुळे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या आदेशान्वये परीक्षा विभागातील चार कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. तेव्हापासून आजपर्यंत परीक्षा प्रक्रियेत कसलीही चूक झालेली नाही.
सर्वत्र परीक्षा व्यवस्थित सुरू आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर सहकेंद्र प्रमुख प्रश्नपत्रिका व अन्य परीक्षा प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे भरारी पथकेही गांभीर्याने सर्व केंद्रांना भेटी देत आहेत. बी.एस्सी.च्या परीक्षेत कसलाही गोंधळ झालेला नाही. तृतीय वर्षाच्या सहाव्या सत्राच्या प्राणिशास्त्र विषयाची परीक्षा अद्याप झालेली नाही. नियोजित वेळापत्रकानुसार ती उद्या बुधवारी व शनिवारी होणार आहे. प्राणिशास्त्र विषयाचे पेपर नजरचुकीने फोडले की कसे, याची खातरजमा करण्यासाठी मंगळवारी डॉ. संभाजी वाघमारे यांच्या भरारी पथकाला वैजापूर येथे, तर प्रा. संजय सांभाळकर यांच्या पथकाला सोयगाव येथे पाठवले. तेव्हा त्याठिकाणी ते पेपर कस्टडीत सीलबंद आढळून आले.