अभ्यास केंद्रामुळे शंभरावर मुलींमध्ये ‘उमेद’
By Admin | Updated: May 21, 2016 23:59 IST2016-05-21T23:44:09+5:302016-05-21T23:59:35+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत

अभ्यास केंद्रामुळे शंभरावर मुलींमध्ये ‘उमेद’
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. दुष्काळाने पिचलेले शेतकरी, शेतमजूरांच्या मुलींना मोफत स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेल्या उमेद मार्गदर्शन केंद्रामुळे सुमारे शंभरावर मुलींमध्ये ‘उमेद’ निर्माण होण्यास मदत झाली आहे.
सातत्याने होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. शेतीमध्ये कामे नसल्याने मजुरांच्या मजुरीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा परिस्थित पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविणेही आवाक्याबाहेर गेले आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी क्लासेसमध्ये पाठविण्याबाबत तर विचार न केलेलाच बरा. हीच बाब लक्षात घेवून जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या संकल्पनेतून शेतकरी, शेतमजूर आणि जि.प. कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केुंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या शंभरावर मुलींना ‘एमपीएससी’ परीक्षेच्या धर्तीवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. दररोज सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ठेवले जाते. दुपारी १ ते २ या वेळत ग्रंथालयात वृत्तपत्र वाचन आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळत अभ्यासिका असते. विशेष म्हणजे शंभर पैकी तब्बल पन्नास टक्के मुली या खेड्यातून येत आहेत. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून आर्थिक क्षमता नसणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींची सोय झाली आहे. केंद्राचे नियोजन शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ घोलप यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शक पुस्तके, मासिक, संदर्भ साहित्य, इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतची क्रमिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विविध प्रकारच्या या पुस्तकांची संख्या सातशेवर आहे. त्याचप्रमाणे अभ्यासिका, संगणक, इंटरनेट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे मुंबई अथवा पुणे येथील खाजगी क्लासेसला जाणे शक्य नव्हते. असे असतानाच जिल्हा परिषदेने मोफत उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याने दिलासा मिळाला. येथे मुंबई, पुण्यापेक्षाही दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचे कळंब येथील पल्लवी रविंद्र शिंदे या विद्यार्थीनीने सांगितले.
४दुष्काळी परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी क्लासेसची पायरी चढणे कठीण झाले आहे. मात्र, जिल्हा परिषदेने उमेद मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याने सर्वसामान्य कुटुंबातील मुलींची सोय झाली आहे, असे ढोकी येथील भाग्यश्री भास्कर लोंढे व संध्या शरद राऊत यांनी सांगितले.