छत्रपती संभाजीनगर : नगरनाका मिटमिटा रस्त्यावरील मोठ्या आकाराच्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने कार हवेत उडून रवी रामनिवास पारिक (३६) या तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि. १८) मध्यरात्री १.३० वाजता वाजता मिटमिटा परिसरातील तारांगण सोसायटीसमोर हा अपघात झाला. यात रवी यांच्यासोबत कारमध्ये असलेला मामेभाऊ व मित्र असलेले दोन सख्खे भाऊ जखमी झाले.
सिटी चौक ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या देवडी बाजार परिसरात रवी आई, वडील, पत्नी व मुलीसह राहत होते. गुरुवारी त्यांचे कन्नडला राहणारे मामा-मामी शहरात कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते रवी यांच्या घरी गेले. रात्री ८ वाजता वाहन भेटत नसल्याने रवी यांनी त्यांना त्यांच्या टाटा सफारी कारने घरी सोडण्याचा निर्णय घेतला. मामेभाऊ राहुल जोशी, मित्र संजय उदय रगडे व त्याचा भाऊ (रा. किलेअर्क) असे सर्व मिळून मामा-मामीला सोडण्यासाठी कन्नडला गेले. १२.३० वाजेच्या सुमारास त्यांना सोडून ते शहराच्या दिशेने निघाले. १.३० वाजेच्या सुमारास तारांगण फाट्यासमोर मात्र त्यांना गतिरोधकाचा अंदाज नाही आला. त्यावरून कार जाताच डाव्या बाजूचे समोरील चाक फुटून कार हवेत उडून पलटी होत जवळपास २० ते २५ फूट घसरत गेली. यात रवी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने जागीच मृत्यू झाला, तर मामेभाऊ जोशी यांच्या छातीला इजा झाली. मागे बसलेल्या एका मित्राचा हात फ्रॅक्चर झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ना ब्लिंकर, ना फलक- सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महिन्याभरापूर्वी पडेगाव रस्त्यावर गतिरोधक बांधण्यात आले. याच रस्त्यावर वर्षभरात सातत्याने अपघात घडत आहे. नाशिक, मुंबई, चाळीसगाव, धुळेसह कैलास लेणी, घुष्णेश्वर मंदिर व देवगिरी किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही अधिक आहे. यामुळे रस्त्यावर नेहमीच अधिक रहदारी असते. अपघात नियंत्रणात आणण्यासाठी पडेगावातील चिनार गार्डनसमोर २, पडेगावात २, शनिमंदिरजवळ २ तर तारांगण फाट्यासमोर एक असे एकूण ७ गतिरोधक बांधण्यात आले.- या सातही गतिरोधकावर केवळ झेब्रा पट्टी मारली आहे. मात्र, रात्री ते लक्षात येण्यासाठी आवश्यक ना ब्लिंकर लावले, ना सूचना फलक लावले. पथदिवेही नसल्याने हे गतिरोधकच लक्षात येत नाही.- सहाही गतिरोधक एकामागे एक आहेत. यामुळे भरधाव येणारी वाहने अचानक गतिरोधकावर आदळून अपघात होतात.
शहरात पहिले डॉग हॉस्टेल केले सुरूरवी यांचे आई-वडील अनेक वर्षांपासून मेस चालवतात, तर रवी यांनी श्वानाचे विविध जातींचे खरेदी-विक्री व्यवसाय करत होते. रवी यांनी शहरात पहिले डॉग हॉस्टेल सुरू केले होते. त्यांच्या या कामासाठी २०१९ मध्ये त्यांना पुरस्कारदेखील मिळाला होता. लवकरच रवी २ एकरवर जमीन घेऊन श्वानांसंबंधी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारण्याचे नियोजन आखत होते. त्यांच्या मित्रांकडे ते सातत्याने याबाबत बोलत होते. शहरात श्वान खरेदी- विक्री व्यवसायात त्यांचे नाव अग्रणी होते. रवी आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होते. त्यांच्या पश्चात आई-वडिलांसह दोन बहिणी, पत्नी व चार वर्षांची मुलगी आहे.
डायल ११२ चे कर्मचारी माहिती घेण्यात व्यस्त राहिलेअपघात होताच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिकांनी ११२ला संपर्क साधला. मात्र, ११२ या हेल्पलाइनला कॉलच कनेक्ट झाला नाही. कॉल रिसिव्ह झाल्यानंतरही कर्मचारी माहिती नोंदवून घेण्यातच अधिक वेळ घेत राहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Web Summary : A businessman died, and two others were injured near Chhatrapati Sambhajinagar after a car accident caused by a misjudged speed bump. The car flipped due to the impact. Negligence in speed bump visibility is suspected.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर के पास स्पीड ब्रेकर का गलत अनुमान लगाने से कार पलटने से एक व्यवसायी की मौत हो गई और दो अन्य घायल हो गए। गति अवरोधक की दृश्यता में लापरवाही का संदेह है।