अण्णा भाऊ साठे साहित्यातील चमत्कार - रामनाथ चव्हाण
By Admin | Updated: August 24, 2014 23:48 IST2014-08-24T23:30:42+5:302014-08-24T23:48:57+5:30
साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मनपातर्फे रविवारी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात व्याख्यानाचे आयोजन केले होते़

अण्णा भाऊ साठे साहित्यातील चमत्कार - रामनाथ चव्हाण
नांदेड: समाजाच्या शाळेत शिक्षण घेतलेले अण्णा भाऊ साठे साहित्यातील चमत्कार होते, असे प्रतिपादन पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख प्रा़ रामनाथ चव्हाण यांनी केले़
साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मनपातर्फे रविवारी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात व्याख्यानाचे आयोजन केले होते़ यावेळी परिवर्तनाच्या चळवळीत युवकांचे योगदान या विषयावर ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी महापौर अब्दुल सत्तार होते़ उद्घाटन पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांच्या हस्ते करण्यात आले़ प्रमुख पाहुणे म्हणून दुसरे व्याख्याते दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा़ मच्छिंद्र सकटे व ज्यु़ जॉनी लिव्हर रामेश्वर भालेराव यांची उपस्थिती होती़
प्रा़ चव्हाण म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी उपेक्षितांचे जगणे प्रथमच जगासमोर मांडले़ अण्णा भाऊ हे कोण्या एका जाती, धर्माचे नव्हते तर समस्त श्रमीकांचे नायक होते़ आजच्या तरूणांनी हा संदेश घेवून जात, धर्माच्या पलीकडे जाऊन देश उभारणीसाठी कार्य करावे़ ज्ञान लालसेच्या बळावर राष्ट्र निर्मितीचा ध्यास घेऊन तरूणांनी सामाजिक बांधीलकी जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले़ पालकमंत्री सावंत म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य मौल्यवान आहे़ मातंग समाजातील युवकांनी ज्ञानाच्या कक्षा वाढवून विकासाचे ध्येय बाळगावे़
मातंग समाज व चळवळ या विषयावर विचार व्यक्त करताना प्रा़ सकटे म्हणाले, वैचारिक बैठक नसल्यामुळे मातंग समाजाची चळवळ गटा, तटात विभागली आहे़ व्यवस्था बदलासाठी चळवळ अत्यंत महत्वाची आहे़ परंतु मातंग समाजात अशी चळवळ निर्माण होताना दिसत नाही़ त्यामुळेच आजही अनेक प्रश्न घेऊन समाज जगत आहे़ त्यासाठी एकत्रित येऊन लढावे लागणार आहे़ अण्णा भाऊ साठे हे केवळ लोकशाहीरच नव्हे तर त्यांनी साहित्यातील सर्वच प्रकार हाताळले आहेत़ त्यामुळे त्यांना शाहिर या एका शब्दात अडकवून ठेवू नये़ प्रास्ताविक स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांनी केले़
ओंकार दाढेल या विद्यार्थ्यांने अण्णा भाऊंच्या जीवनकार्यावर भाषण केले़ कार्यक्रमास उपमहापौर चव्हाण, आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे, उपायुक्त विद्या गायकवाड, आनंद जाधव, डॉ़ करूणा जमदाडे, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन उपअभियंता प्रकाश कांबळे व बालाजी गवाले यांनी केले़ यशस्वीतेसाठी उपअभियंता विश्वनाथ स्वामी आरसुडे, दंडे, वैजनाथ दुनघव, भालचंद्र पवळे, गजानन पवळे, व्यंकटी कलवले, बोडके, ठाणेदार यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)