हिमायतनगरातील चार तलावात अत्यल्प साठा
By Admin | Updated: July 7, 2014 00:20 IST2014-07-07T00:05:26+5:302014-07-07T00:20:18+5:30
हिमायतनगर : तालुक्यातील पवना, सवना (ज़), पोटा, दुधड तलावातील पाणीसाठा १० ते १५ टक्के असून तलावाच्या आत गाळात जावून जनावरांना पाणी प्यावे लागत आहे़
हिमायतनगरातील चार तलावात अत्यल्प साठा
हिमायतनगर : तालुक्यातील पवना, सवना (ज़), पोटा, दुधड तलावातील पाणीसाठा १० ते १५ टक्के असून तलावाच्या आत गाळात जावून जनावरांना पाणी प्यावे लागत आहे़ वाहते पाणी नसल्याने जनावरांची अबाळ तर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण होत आहे़
तालुक्यातील सवना (ज़), पवना, दुधड, पोटा तलाव गाळाने भरला आहे़ तसेच येथे बेशरमही वाढले़ परिणामी १० ते १५ टक्के एवढाच पाणीसाठा तलावात शिल्लक राहिला आहे़ पावसाळा सुरु झाला मात्र पाऊस नाही़ त्यामुळे बोअर, विहिरीचे पाणी मोटारीद्वारे बाहेर काढून जनावरांना पाजवावे लागत आहे़ ओला चारा पहावयासही मिळत नाही़ चाऱ्याची चणचण भासत असल्याने कडब्याचे दर वधारले आहेत़
पाऊस पडेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली़ महिना लोटला तरी पाऊस नसल्याने पेरलेले बियाणे वाया गेले़ दुबार पेरणीसाठी शेतकरी हवालदिल आहे़ बँकेचे कर्ज, खाजगी कर्ज काढून पेरणी केली़ आता पुढे काय हा प्रश्न आहे़ पाण्यासाठी ईश्वराला आळवणी, प्रार्थना, भजन, कीर्तन, देवाला पाणी टाकणे, भंडारा आदी ग्रामीण भागात चालू आहे़ जून कोरडा गेला़ जुलैमध्ये कडाक्याचे उन आहे़ दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़
कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रकाश शिंदे, दत्तराव जाधव, संतोष गाजेवार, विठ्ठलराव गुंफलवाड, बापुराव बोड्डेवार, दगडू काईतवाड, नारायण करेवाड आदींनी केली़ (वार्ताहर)