मिनी मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी देणार स्वेच्छानिधी
By Admin | Updated: April 19, 2015 00:46 IST2015-04-19T00:32:59+5:302015-04-19T00:46:03+5:30
जालना : राज्य शासनाच्या पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाकरीता जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सर्व सदस्यांसह अधिकारी

मिनी मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी देणार स्वेच्छानिधी
जालना : राज्य शासनाच्या पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाकरीता जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सर्व सदस्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कमी होणारे पर्जन्यमान व त्यामुळे खालावत चाललेली जमिनीतील पाणी पातळी यामुळे टंचाईचे प्रमाण वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशा परिस्थितीत यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयास जिल्हा परिषदेने मोठा प्रतिसाद दिला आहे.
शुक्रवारी सायंकाळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात यासंबंधी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली.
त्यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, कॅफो चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कोल्हे म्हणाले, प्रत्येकजण आयुष्यात स्वत:साठी व आपल्या कुटुंबाच्या भावी पिढीसाठी कमाई करत असतो. सद्यस्थितीत समयसूचकता बाळगून आपण जलयुक्त शिवार अभियानासारख्या उपक्रमास मदत करावी. जेणेकरून आगामी काळात दुष्काळ निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले.
विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही यावेळी आपले मत मांडले. या अभियानाअंतर्गत विविध प्रकल्पांमधील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे व ग्रामस्थांना गाळ वाहून नेण्यासाठी प्रोत्साहित करणे ही महत्वाची कामे करावी लागणार आहेत. वाहनांसाठी डिझेलची व्यवस्था शासनामार्फत केली जात आहे. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे प्रवीण पवार, नंदकिशोर वानखेडे, व्ही.एम. राठोड, लिपिकवर्गीय संघटनेचे अनिल मोरे, संजय चव्हाण, लेखा कर्मचारी संघटनेचे रवींद्र बोर्डे, संतोष नेवारे, मिलिंद कांबळे, जि.प. कर्मचारी महासंघाचे एन.एन. ठाकूर, समता शिक्षक परिषदेचे सुभाष म्हस्के, शिक्षक सेनेचे शिवाजीराव उगले, उफाड, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे कारभारी औटे, उर्दू शिक्षक संघटनेचे अब्दूल्ला चाऊस, के.बी. बुकणे, कास्ट्राईब संघटनेचे नंदकिशोर झिने, मिरकले आदी उपस्थित होते.
याबाबत जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव म्हणाले, आपणासह उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर तसेच सर्व सभापती व सदस्य एक महिन्याचे मानधन अभियानासाठी देणार आहोत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन या कामी स्वेच्छेने द्यावे, असे आवाहन जाधव यांनी केले. त्यानंतर जि.प. शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव उगले यांनी तात्काळ ११ हजार रुपयांची मदत जाहीर केली.