मंत्र्यांचे आश्वासन २ वर्षांचे, प्रतिनियुक्ती महिन्याची
By Admin | Updated: July 13, 2014 00:45 IST2014-07-13T00:32:25+5:302014-07-13T00:45:14+5:30
औरंगाबाद :तीन महिन्यांच्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या मूत्ररोगतज्ज्ञाला दोन वर्षांची प्रतिनियुक्ती देण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांना दिले होते.

मंत्र्यांचे आश्वासन २ वर्षांचे, प्रतिनियुक्ती महिन्याची
औरंगाबाद : रुग्णांची गरज ओळखून तीन महिन्यांच्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या मूत्ररोगतज्ज्ञाला दोन दिवसांत दोन वर्षांची प्रतिनियुक्ती देण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांना दिले होते. आव्हाड यांचा दौरा संपताच वैद्यकीय शिक्षण संचालकांनी त्यांच्या आदेशाला गुंडाळून या तज्ज्ञाला केवळ एक महिन्याची प्रतिनियुक्ती दिल्याचे उघड झाले आहे.
मूतखडा आणि मूत्ररोगासंबंधी घाटीत रोज २० ते २५ रुग्ण दाखल होतात. यापैकी अनेकांवर शस्त्रक्रिया करावी लागते. येथील रुग्णांची गरज लक्षात घेऊन अधिष्ठातांनी केलेल्या मागणीनंतर एक वर्षापूर्वी डॉ. व्यंकट गिते या मूत्ररोगतज्ज्ञाला मुंबईतील जे.जे. रुग्णालयातून घाटीत प्रतिनियुक्ती देण्यात आली. वर्षभरापासून डॉ. गिते यांना तीन महिन्यांसाठी प्रतिनियुक्ती देण्यात येते. दर तीन महिन्यांनंतर डॉ. गिते आणि घाटी प्रशासनाला कागदी घोडे नाचवावे लागतात. त्यानंतर त्यांना प्रतिनियुक्ती मिळते. हा प्रकार वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे घाटीच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आणून देण्यात आला. त्यावेळी आव्हाड यांनी मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. गिते यांना दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्ती देतो, असे आश्वासन दिले आणि सोबत असलेल्या वैद्यकीय संचालकांना याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले.
या आदेशाला संचालकांनी केराची टोपली दाखवत डॉ. गिते यांना १ ते ३१ जुलै या कालावधीसाठी प्रतिनियुक्ती दिली.
प्रस्तावास टाळाटाळ
दोन वर्षे प्रतिनियुक्ती देण्याचे अधिकार शासनाला आहेत. याबाबत मंत्र्यांच्या आदेशाने वैद्यकीय शिक्षण संचालकांनी याविषयीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्याकडूनही प्रस्ताव पाठविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. गिते यांच्या प्रतिनियुक्तीसंदर्भात ३१ जुलैपूर्वी निर्णय न झाल्यास रुग्णांना उपचारासाठी वाट बघावी लागेल.