लाभार्थी संख्येअभावी उत्पन्न अत्यल्प
By Admin | Updated: July 24, 2014 00:08 IST2014-07-23T23:34:19+5:302014-07-24T00:08:05+5:30
बीड: महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतील लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना शासनाने प्राधिकृत केलेली विमा कंपनी पैसे देते.

लाभार्थी संख्येअभावी उत्पन्न अत्यल्प
बीड: महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतील लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना शासनाने प्राधिकृत केलेली विमा कंपनी पैसे देते. जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव असल्या कारणामुळे या योजनेचे लाभार्थी उपचारासाठी पसंती देत नसल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.
शासनाने दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील (पांढरी शिधा पत्रिकाधारक वगळता) नागरिकांना अत्याधुनिक व सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु केली आहे. ही योजना एका राष्ट्रीय विमा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे. या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील सर्व व्यक्तींना घेता येणे शक्य आहे. यामध्ये जनरल सर्जरी, पेडियाट्रीक सर्जरी, न्युरो सर्जरी, बर्न यासह वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावर शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना जिल्हा रुग्णालयातील राजीव गांधी जीवनदायी योजना विभागाशी संपर्क साधून त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना एक कार्ड देण्यात येते. या कार्डवर एक कुटुंब एक वर्षात दीड लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया किंवा उपचार घेऊ शकतो. या योजनेचा अधिक प्रचार व प्रसार झाल्यामुळे दिवसागणिक लाभार्थी नोंदणीची प्रक्रिया वाढली आहे. लाभार्थ्यांना उपचार घेण्यासाठी त्यांची प्राथमिक तपासणी केली जाते. आजार गंभीर असल्यास किंवा रुग्णास शस्त्रक्रियेची गरज भासल्यास त्याला ज्या ठिकाणी इच्छा असेल त्या ठिकाणी तो रुग्ण उपचार घेऊ शकतो.
काय झाली समस्या
बीड जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवरच व्यवस्थित उपचार होत नसल्याने राजीव गांधी जीवनदायी योजनेचे लाभार्थी जिल्हा रुग्णालयात उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी येत नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे लाभार्थी जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत नसल्याने रुग्णालयास उत्पन्न मिळत नाही. केवळ तीन ते चार जणांनी उपचार घेतले आहेत. त्यांच्या विम्याचे बिल अद्याप जिल्हा रुग्णालयास मिळणे बाकी आहे. त्या तुलनेत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बऱ्यापैकी उपचार होत असल्याने अनेक रुग्ण तेथे उपचार घेण्यास पसंती देत आहेत. वर्षभराच्या कालावधीत वीस ते पंचवीस रुग्णांना उपचार घेतले असून त्यातून स्वारातीला चाळीस लाखांच्या जवळपास उत्पन्न मिळाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राजीव गांधी योजनेर्तंगत लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना अधिक रक्कम दिली जाते. मात्र जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे येथे उपचारासाठी येण्यास रुग्णांनी पाठ फिरवली आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा शल्यचिकित्सकांचेही दुर्लक्ष
जिल्हा रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याने शस्त्रक्रियेसाठी अनेकांनी फिरवली पाठ
राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना मिळतो निधी
बीड जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने इतर रुग्णालयांना पसंती