मिनी मंत्रालय तहानेने व्याकूळ !
By Admin | Updated: September 19, 2014 01:00 IST2014-09-19T00:47:32+5:302014-09-19T01:00:32+5:30
लातूर : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा परिषेदत पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर असले तरी त्यात गेल्या तीन वर्षांपासून बिघाड झाल्याने

मिनी मंत्रालय तहानेने व्याकूळ !
लातूर : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा परिषेदत पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर असले तरी त्यात गेल्या तीन वर्षांपासून बिघाड झाल्याने ते केवळ ‘शोभेची वस्तू’ ठरत आहेत़ परिणामी, विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना नजीकच्या हॉटेलचा सहारा घ्यावा लागत आहे़ त्यामुळे नागरिकांबरोबरच कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे़ ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी जिल्हा परिषद ही महत्त्वाची आहे़ येथील जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी दररोज ये- जा करणाऱ्या नागरिकांची संख्या जवळपास ६०० पेक्षा जास्त आहे़ तसेच जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेचे गेल्या दीड वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले आहे़ त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना किमान पिण्यासाठी पाणी मिळणे तरी अपेक्षित होते. जिल्हा परिषदेची मुख्य इमारत ही तीन मजली आहे़ त्याचबरोबर परिसरातील अन्य तीन इमारतींत विविध विभाग आहेत़ तीन मजली इमारतीतील पायऱ्यानजीक पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून वॉटर कुलर गेल्या काही वर्षांपूर्वी बसविण्यात आले़ सुरुवातीस जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची आणि विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची तहान भागू लागली़ परंतु, गेल्या तीन वर्षांपासून या वॉटर कुलरमध्ये बिघाड झाला आहे़ परिणामी, हे वॉटर कुलर ‘केवळ शोभेची वस्तू’ बनले आहेत़ जिल्हा परिषदेच्या इमारतीत पिण्यासाठी शुध्द पाणी नसल्याने कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाईलाजास्तव खाजगी हॉटेलचा आधार घ्यावा लागत आहे़ त्यामुळे अनेकदा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा विभागाऐवजी हॉटेलवर जास्त वेळ जात असल्याचे पहावयास मिळत आहे़ जिल्हा परिषदेच्या परिसरात नळ असले तरी त्यास नेहमी पाणी असेलच असे सांगता येत नाही़ परिणामी, नागरिकांनाही हॉटेलवरील पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याचे दिसून येत आहे़ या इमारतीतील वॉटर कुलरची दुरुस्ती करण्यात येऊन पाणीपुरवठा केला जावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे़ वॉटर कुलरमध्ये पाणीच नसल्याने अनेकजण त्या ठिकाणचा थुंकण्यासाठीही वापर करीत असल्याचे पहावयास मिळते़ त्यामुळे वॉटर कुलरचे कोपरे पिचकाऱ्यांनी रंगले आहेत़ विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या डागडुजी व रंगरंगोटीवेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोपरे पिचकाऱ्यांनी रंगू नयेत म्हणून आरसे बसविले आहेत़ त्यामुळे कोपरे रंगणे थांबले असले तरी वॉटरकुलरचे कोपरे रंगले आहेत़ (प्रतिनिधी) विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या मनात आपले काम करुन घेण्यासाठी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याला किमान चहा तरी पाजला पाहिजे, अशी भावना असते़ त्यामुळे कामानिमित्ताने आलेले बहुतांशी नागरिक हे कर्मचाऱ्यास ‘साहेब, चला जरा पाणी पिऊन येऊ’ असे म्हणत असताना ऐकावयास मिळते़ त्यामुळे कर्मचाऱ्याला त्याचा आग्रह मोडता येत नाही़ तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेतील वॉटर कुलर बंद आहे. मध्यंतरीच्या कालावधीत ते सुरू करण्याचा प्रयत्नही झाला. परंतु, काही कर्मचारी म्हणतात की, वॉटर कुलरमध्ये पडणारे पाणी पिण्यास योग्य नाही. त्यातच बिघाड झाला आहे. हे वॉटर कुलर दुरुस्तीसाठी विचाराधीन असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी सांगितले.