जमिनीखाली साकारतेय ‘मिनी जायकवाडी’
By Admin | Updated: December 28, 2015 23:47 IST2015-12-28T23:42:37+5:302015-12-28T23:47:28+5:30
औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीतील खुल्या जागा तसेच कंपनी परिसरात शोषखड्ड्यांची उभारणी करून पावसाच्या पाण्याचा थेंब न्थेंब जमिनीत मुरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

जमिनीखाली साकारतेय ‘मिनी जायकवाडी’
औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीतील खुल्या जागा तसेच कंपनी परिसरात शोषखड्ड्यांची उभारणी करून पावसाच्या पाण्याचा थेंब न्थेंब जमिनीत मुरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आतापर्यंत ३० शोषखड्डे खोदण्यात आले असून, त्याद्वारे ६० लाख लिटर पाणी जमिनीत मुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे शोषखड्ड्यांच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीच्या खाली ‘मिनी जायकवाडी’च साकारण्याचा संकल्प चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केला आहे. ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आशिष गर्दे, उद्योजक उमेश दाशरथी, ‘एमआयडीसी’चे कार्यकारी अभियंता राजेंद्र गावडे, जलदूत संस्थेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी सोमवारी (दि. २८) पत्रकारांशी बोलताना या उपक्रमाची माहिती दिली. १,५०० हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वाळूज औद्योगिक वसाहतीत अनेक मोकळ्या जागा आहेत. तेथे पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविल्यास जमिनीखाली ‘मिनी जायकवाडी’च तयार होऊ शकते. मराठवाड्यात दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवेतून जलसंवर्धनाच्या क्षेत्रात भरीव काम करण्याचा निर्णय ‘सीएमआयए’ आणि ‘एमआयडीसी’ने घेतला. पहिल्या टप्प्यात औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागांवर ३ मीटर लांब, ३ मीटर रुंद व ३ मीटर खोलीचे शोषखड्डे तयार केले जातील. डबर, विटांचे तुकडे, मोठी खडी, लहान खडी, जाडसर रेतीने हे खड्डे भरले जातील. एका खड्ड्यामुळे किमान २ लाख लिटर पाणी झिरपेल. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढेल. परिसरातील वसाहतींना त्याचा मोठा उपयोग होईल, असे दाशरथी यांनी सांगितले.औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागांवर विविध उद्योगांनी सध्या ३५ शोषखड्डे खोदले आहेत. याचाच अर्थ पावसाचे किमान ७० लाख लिटर पाणी यात झिरपेल. कंपनी परिसरातदेखील असे खड्डे खोदण्यात येणार असून, किमान एक कोटी लिटर पाणी जमिनीत झिरपेल, असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, असे गर्दे यांनी स्पष्ट केले. 2या उपक्रमामुळे उद्योगांसाठी हक्काची ‘वॉटर बँक’ तयार होईल. परिसरातील वसाहती व गावांत शेती तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास गावडे यांनी व्यक्त केला. औरंगाबाद शहराच्या तिन्ही बाजूंना शोषखड्ड्यांच्या माध्यमातून पाणी अडविल्यास शहराच्या गरजेपैकी ३० टक्के पाणी जमिनीत मुरू शकते, असे शितोळे म्हणाले.