‘एमआयएम’ तर सेटलमेंट पक्ष
By Admin | Updated: April 16, 2015 01:02 IST2015-04-16T00:05:32+5:302015-04-16T01:02:11+5:30
औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष नेहमीच सेटलमेंट करीत आला आहे.

‘एमआयएम’ तर सेटलमेंट पक्ष
औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष नेहमीच सेटलमेंट करीत आला आहे. औरंगाबादेत मुस्लिम बांधवांना ‘कलमा’ पढण्यास सांगणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांनी अगोदर वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेसोबत केलेली छुपी युती जगासमोर मांडावी. असे खुले आवाहन समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आज औरंगाबादेत केले.
समाजवादी पक्षाचे १२ उमेदवार औरंगाबाद मनपाच्या निवडणुकीत उभे करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रचारानिमित्त आझमी बुधवारी शहरात दाखल झाले. प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, एमआयएमचे दोन आमदार पालकमंत्री रामदास कदम यांच्या कक्षात जात होते. त्यांना रामदास कदमकडे जाऊ नका, असे काँग्रेस नेते आरेफ नसीम समजावून सांगत होते. त्यांचे न ऐकता दोन्ही आमदार त्यांच्याकडे कशासाठी गेले होते.
वांद्रे पोटनिवडणुकीपूर्वी कदम आणि एमआयएमच्या आमदारांमध्ये कोणती सेटलमेंट झाली, याचे उत्तर दिले पाहिजे. एमआयएमचे काम न करणाऱ्या मुस्लिम बांधवांना थेट धर्माबाहेर काढण्याचा अधिकार कोणी दिला. एमआयएमचे नेते सच्चे मुसलमान असतील तर वांद्रे येथील गुपित जगासमोर मांडावे, असेही आझमी यांनी नमूद केले. समाजवादी पार्टीने वांद्रे पोटनिवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. एक चांगला नेता सभागृहात यावा हा त्यामागचा हेतू होता.
राज्यातील सेना-भाजप युतीवर जोरदार हल्ला चढवत गोहत्याबंदीमुळे राज्यात असंख्य नागरिक बेरोजगार झाले. शेतकऱ्यांच्या वृद्ध जनावरांचा सांभाळ कोणी करावा. सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरांची नावे बदलल्याने विकास होत नाही. औरंगाबाद हे नाव चांगले आहे. औरंगजेब सेक्युलर होते. त्यांच्या नावाने शहर वसले आहे, त्यावर कोणाचा आक्षेप असायला नको. औरंगाबादेत मागील दहा वर्षांमध्ये हज हाऊसची स्थापना न झाल्याबद्दलही आझमी यांनी नाराजी दर्शविली. पत्रकार परिषदेला समाजवादी पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.