बुढीलेनमध्ये एमआयएमला दोन्ही काँग्रेसचे आव्हान
By Admin | Updated: August 10, 2016 00:28 IST2016-08-10T00:15:22+5:302016-08-10T00:28:29+5:30
औरंगाबाद : जुन्या शहरातील अत्यंत मध्यवर्ती भाग असलेल्या बुढीलेन वॉर्ड क्र २१ मध्ये पोटनिवडणुकीत एमआयएमला कडवट आव्हान देण्यासाठी दोन माजी नगरसेविका काँग्रेस

बुढीलेनमध्ये एमआयएमला दोन्ही काँग्रेसचे आव्हान
औरंगाबाद : जुन्या शहरातील अत्यंत मध्यवर्ती भाग असलेल्या बुढीलेन वॉर्ड क्र २१ मध्ये पोटनिवडणुकीत एमआयएमला कडवट आव्हान देण्यासाठी दोन माजी नगरसेविका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. हा वॉर्ड परत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी एमआयएमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बुढीलेन वॉर्डात एमआयएमचे कार्यकर्ते शेख रफीक यांच्या मातोश्री शहनाज बेगम मोहंमद खाजामियाँ यांना एमआयएमने उमेदवारी दिली आहे. मंगळवारी दुपारी आ. इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत शहनाज बेगम यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अॅड. अन्वर कादरी, विरोधी पक्षनेता अय्युब जहागीरदार, गटनेता नासेर सिद्दीकी, नगरसेवक फिरोज खान आदींची उपस्थिती होती.
काँग्रेसतर्फे या वॉर्डातून माजी नगरसेविका निखत एजाज झैदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या उपस्थितीत झैदी यांचा अर्ज मोठ्या उत्साहात भरण्यात आला. २०१५ मध्ये निखत झैदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. झैदी यांना १०८३ मते पडली होती.
मागील निवडणुकीत कैसर खान यांनी आपली मुलगी खान राणा कौसर हिला काँग्रेसच्या तिकिटावर उभे केले होते. तिने ९७५ मते मिळविली होती. आता खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्नी तथा माजी नगरसेविका परवीन कैसर खान यांना उभे केले आहे. या निवडणुकीत त्यांची आणखी एक डोकेदुखी म्हणजे कैसर खान यांचा पुतण्या तथा नगरसेवक फिरोज खान आपल्या काकूच्या विरोधात प्रचार करणार आहे. अपक्ष उमेदवार म्हणून अहेमद तरन्नुम अखिल, नसरीन बेगम सय्यद आबेद अली यांनीही उमेदवारी दाखल केली.