सेलूत लाखो लिटरची पाणीचोरी

By Admin | Updated: April 26, 2016 23:50 IST2016-04-26T23:38:53+5:302016-04-26T23:50:07+5:30

मोहन बोराडे, सेलू निम्न दुधना प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाण्याची चोरी

Millions of liters of salt water | सेलूत लाखो लिटरची पाणीचोरी

सेलूत लाखो लिटरची पाणीचोरी

मोहन बोराडे, सेलू
निम्न दुधना प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाण्याची चोरी आणि अपव्यय होत असून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याची बाब मंगळवारी ‘लोकमत’ने सेलू शहरात केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आली. तर दुसरीकडे शहरातील जाकेर हुसेननगरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचेही या पाहणीत आढळले.
वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत निम्नदुधना प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होेतो. दररोज सुमारे २५ लाख लिटर पाणी जलवाहिनीद्वारे शहरवासियांना पुरविले जाते. शहरापासून १५ कि.मी. अंतरावरुन हे पाणी आणले जाते. पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी या पंधरा कि.मी. अंतराच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी व्हॉल्व्ह बसविले आहेत. या व्हॉल्व्हला असलेल्या गळतीच्या जागी अनेकांनी पाईप टाकून पाणी चोरण्याचा प्रकार केला आहे. पाणी चोरी प्रश्नी ‘लोकमत’ने संपूर्ण १५ कि.मी. अंतराच्या जलवाहिनीचे स्टींग आॅपरेशन केले असता, पाच ठिकाणी चोरून पाणी पळविले जात असल्याचे निदर्शनास आले. काहींनी शेती भिजविण्यासाठी तर काहींनी हॉटेल, वीटभट्टी व्यवसायासाठी हे पाणी नेल्याची बाब पुढे आली. तसेच या पाहणीत या मार्गावरील काही निवासस्थानांमध्ये व्हॉल्व्हमधील पाणी पळविले आहे.
सेलू- परभणी रस्त्यावरील जुन्या जलशुद्धीकरण केंद्रासमोरील व्हॉल्व्हमधून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या व्हॉल्व्हमधून येणारे पाणी दोन कि.मी. अंतरावरील कवडधन पाटीपर्यंत पाटासारखे वाहताना दिसले. जलशुद्धीकरण केंद्र ते कवडधन पाटी या दरम्यान रस्त्याच्या उजव्या बाजूस ठिकठिकाणी व्हॉल्व्हमधून गळती झालेले पाणी साचले आहे. लातूर शहर हंडाभर पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे. सुदैवाने निम्न दुधना प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करताना कुठलीही अडचण येत नाही. परंतु, असलेल्या पाण्याचा काळजीपूर्वक वापर होण्याऐवजी चोरी आणि अपव्यय होत आहे.
हादगाव पावडे पाटीजवळ मुख्य जलवाहिनीतून बाजुलाच असलेल्या दगडी खाणीत पाणी साठविले जात आहे. या पाण्याचा उपयोग हादगाव येथील ग्रामस्थ कपडे धुण्यासाठी करताना पहावयास मिळाले. दुष्काळातही पाण्याचा अपव्यय व चोरी होत असताना न.प.चा पाणीपुरवठा विभाग मूग गिळून गप्प आहे. अनेकवेळा जलकुंभ ‘ओव्हरफ्लो’ होऊन पाण्याचे डबके साचत आहे. लाखो लिटर पाण्याचा अपव्यय व चोरी होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यवय होत असताना शहरातील काही भागात मात्र कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी दोन-दोन तास ताटकळत उभे रहावे लागत आहे. शहरातील हे दोन चित्र सुज्ञ नागरिकांना सुन्न करणारे आहेत.

Web Title: Millions of liters of salt water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.