कोट्यवधींच्या कामांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 00:22 IST2016-07-26T00:14:14+5:302016-07-26T00:22:05+5:30
औरंगाबाद : मराठवाडा सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागांतर्गत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांची कामे चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहेत.

कोट्यवधींच्या कामांची चौकशी
औरंगाबाद : मराठवाडा सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागांतर्गत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांची कामे चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर गुणवत्ता व दक्षता विभागाकडून या कामांचा चौकशीपूर्ण अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कामांमध्ये रस्ते व इमारत निर्मितीच्या कामांचा समावेश आहे. औरंगाबाद, नांदेड, लातूर या परिमंडळांतर्गत बांधकाम विभागाचा विस्तार मराठवाड्यात झालेला आहे. औरंगाबाद मंडळात जालना जिल्ह्याचा समावेश आहे.
नांदेडमध्ये परभणी, हिंगोलीचा, तर लातूरमध्ये उस्मानाबाद, बीडचा समावेश आहे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता अशा स्तरावरून मंजूर झालेल्या कामांबाबत तक्रारी आल्यानंतर गुणवत्ता व दक्षता अधीक्षक अभियंता विभागाकडून त्या कामांची चौकशी सुरू होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ७० ते ८० कामांची चौकशी सुरू आहे. जी कामे निकृष्ट असतील, त्यामध्ये दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच निविदेत कंत्राटदारांकडे दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी असेल तर त्याअंतर्गत कामे पूर्ण करून घेतली जातात, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गुणवत्ता व दक्षता विभागाचे अधीक्षक अभियंता डी. डी. उकिर्डे यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, निश्चित किती प्रकरणांत चौकशी सुरू आहे, हे सांगता येणार नाही. तक्रारअंती विभाग चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येतो.