कोट्यवधींची उलाढाल
By Admin | Updated: October 31, 2016 00:34 IST2016-10-31T00:31:52+5:302016-10-31T00:34:09+5:30
उस्मानाबाद : दिवाळी सणानिमित्त वाहन खरेदीकडे जिल्ह्यातील नागरिकांनी यंदा मोठा कल दिला आहे़

कोट्यवधींची उलाढाल
उस्मानाबाद : दिवाळी सणानिमित्त वाहन खरेदीकडे जिल्ह्यातील नागरिकांनी यंदा मोठा कल दिला आहे़ शहरातील केवळ सहा वाहन विक्रेत्यांच्या दुकानातून तब्बल ५२०० दुचाकी आणि ५३ ट्रॅक्टर्सची विक्री झाली़ तर शहरातील इतर वाहन विक्रेत्यांची संख्या याच तुलनेत असल्याचे समजते़ वाहन खरेदी-विक्रीतून शहरात कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली असून, सोमवारी पाडव्यानिमित्तही या उलाढालीत मोठी वाढ होणार आहे़
यंदा परतीचा पाऊस समाधानकारक झाल्याने दिवाळीतील उलाढाल वाढली आहे़ दिवाळी सणानिमित्त कपडे, सोन्यांसह वाहन खरेदी करण्यासाठी अबालवृध्दांपासून महिला-युवतींची मोठी धावपळ सुरू असल्याचे दिसून आले़ जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरात दुचाकीसह चारचाकी वाहने, ट्रॅक्टरची विक्री करणारे अनेक डिलर आहेत़ तर काही जण सबडिलर म्हणून वाहनांची विक्री करीत आहेत़ वाहनांच्या नेहमी होणाऱ्या खरेदी-विक्रीपेक्षा दिवाळीत याचे प्रमाण अधिक असते़
दिवाळीत लक्ष्मी पूजनाला, पाडव्याच्या दिनी नवीन वाहन घरी नेण्यासाठी एक ते दीड महिना अगोदरच अनेकांनी वाहनांची बुकींग करून ठेवली आहे़ शहरातील तीन विक्रेत्यांकडून एक दोन नव्हे तब्बल ५२०० दुचाकींची दिवाळीनिमित्त विक्री झाली आहे़ यात एका विक्रेत्याकडून ५५०, दुसऱ्या विक्रेत्याकडून २९०० तर तिसऱ्या विक्रेत्याकडून १८०० दुचाकींची विक्री झाली आहे़ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातील ग्राहकांनी या दुचाकी आपापल्या घरी नेल्या आहेत़ शहरात ट्रॅक्टरची विक्री करणारेही अनेक डिलर आहेत़ यातील तीन व्यवसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त तब्बल ५३ ट्रॅक्टरची विक्री झाल्याचे सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)