दूध वाढले; पण भाव पडले

By Admin | Updated: November 20, 2014 00:48 IST2014-11-20T00:33:02+5:302014-11-20T00:48:35+5:30

संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव , बीड गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी स्थितीशी सामना करणारे शेतकरी मोठ्या आशेने दूध उत्पादनाकडे वळले;परंतु दुधाचे भाव लिटरमागे तीन रुपयांनी कमी झाले़

Milk increased; But the price fell | दूध वाढले; पण भाव पडले

दूध वाढले; पण भाव पडले



संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव , बीड
गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी स्थितीशी सामना करणारे शेतकरी मोठ्या आशेने दूध उत्पादनाकडे वळले;परंतु दुधाचे भाव लिटरमागे तीन रुपयांनी कमी झाले़ त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या खिशाला थोडीथोडकी नव्हे तर रोज पाऊणेनऊ लाखांची झळ सोसावी लागत आहे़ खरीप, रबी हंगामात शेतकऱ्यांची निराशाच झाली; पण दुधाचे भाव घसरल्याने दुष्काळात तेरावा... अशी स्थिती निर्माण झाली आहे़ दर गडगडल्याने शेतीच्या महत्त्वाच्या जोडधंद्यावरच घाव बसला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा पुरता कोलमडण्याची भीती आहे.
धवलक्रांतीत जिल्हा नेहमीच अग्रस्थानी राहिलेला आहे़ शेतीसोबतच दुधाचा व्यवसाय करुन उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत शेतकऱ्यांनी प्रगतीच्या वाटा शोधल्या़ मात्र, महिनाभरापासून दुधाचे भाव गडगडले़ त्यामुळे खर्च व उत्पन्नाचा ताळमेळच लागायला तयार नाही़
शासकीय दूध संकलन केंद्र, सहकारी संस्था तसेच खासगी संस्था मिळून गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात एकूण दूध उत्पादन केवळ २ लाख २४ हजार ५२५ लिटर इतके होते़ यावर्षी आॅक्टोबर महिन्यातील दूधसंकलनाचा आकडा २ लाख ९१ हजार ७०५ लिटर इतका आहे़ गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ६७ हजार १८० लिटर दूध वाढलेले आहे़
दूधपावडरची आयात- निर्यात बंद आहे़ त्यामुळे दूधपावडरचे अनेक प्लँट बंद पडले आहेत़ परिणामी दूध खरेदीवर त्याचा परिणाम झाला असून भाव कोसळले आहेत़ एका लिटरमागे तीन रुपयांपर्यंत भाव कोसळल्याने शेतकऱ्यांत कमालीची अस्वस्थता आहे़ ३.५ इतक्या फॅटला २३ रुपयांपर्यंत भाव होता तो आता २० रुपयांवर येऊन टेकला आहे तर ५.० इतक्या फॅटच्या दुधासाठी २७ रुपयांपर्यंत भाव मिळत होता़ आता केवळ २४ रुपये मिळतात़ त्यामुळे उत्पादक अडचणीत आले आहेत़
जिल्ह्यातील एकूण पशुधन ८ लाख २५ हजार ४३४ इतके आहे़ ६ लाख ६८ हजार २६६ मोठ्या तर १ लाख ५७ हजार १६६ इतक्या लहान जनावरांचा यात समावेश आहे़ या सर्व गुरांना जगविण्यासाठी जिल्ह्यात केवळ ६ लाख १६ हजार १४४ मेट्रिक टन इतका चारा उपलब्ध आहे़ हा चारा केवळ १५ मार्चपर्यंत पुरेल इतका आहे़ पाटोदा, आष्टी, शिरुर, गेवराई या तालुक्यात चाराटंचाईचे संकट अधिक आहे़ जानेवारी २०१५ पर्यंत पुरेल इतकाच चारा शेतकऱ्यांकडे आहे़
जिल्हा सहकारी दुधउत्पादक संघाचे कार्यकारी संचालक एम़ के़ गिते म्हणाले, चालू वर्षी दुधाचे संकलन चार ते पाच हजार लिटरपर्यंत वाढले होते़ आता अशी स्थिती नाही़ संकलन हळूहळू घटण्यास सुरुवात झाली आहे़
४दुधपावडरचे प्लँट बंद पडल्याने ही स्थिती ओढावली आहे़ उत्पादन वाढले असते तर शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे खेळले असते;परंतु पावसाने दगा दिल्याने परिस्थिती बिकट बनली आहे़
दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई आहे़ चाऱ्याचे भाव ३ हजारापेक्षा पुढे सरकल्याने आता जित्राब जगवायचं कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे़ काही शेतकऱ्यांनी आतापासूनच गुरांना बाजार दाखविण्यास सुरुवात केली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागत आहे़ मात्र, गुरे जगविण्यासाठी हाती चाराच नसल्याने गुरांना बाजार दाखविल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, अशी स्थिती आहे़ दुभती जनावरेही कवडीमोल दराने विकली जात आहेत, असे कान्नापूर (ता. वडवणी) येथील व्यापारी कारभारी खताळ यांनी सांगितले. दरम्यान, चाऱ्याची टंचाई, घटलेले दर यामुळे दुधव्यवसाय पुरता गोत्यात आला आहे़
४दुधाळ जनावरेही बेभाव
दुधाचे दर घसरताच गायींचे भाव देखील गडगडले आहेत़ दोन महिन्यांपूर्वी ६० हजार रुपयांना खरेदी केलेली गाय आज ३० हजाराच्या पुढे विकत नाही़ हिरापूर, नेकनूर येथील बाजारात बेभाव दरात दुधाळ जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे़ पुढच्यावर्षीपर्यंत हे चित्र बदलेल असे वाटत नाही अशी प्रतिक्रिया गेवराई तालुक्यातील ईटकूर येथील दुधउत्पादक संस्थेचे चेअरमन वैजीनाथ मासाळ यांनी व्यक्त केली़
४अनेकांनी व्यवसाय बंद केला
चारा, पेंडीसाठी मोजावे लागणारे पैसे व दुधपासून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळच लागायला तयार नाही़ त्यामुळे अनेकांनी दुधव्यवसाय बंद करणे पसंत केले़ दुधसंकलन घटले असून चाऱ्याचे भाव कडाडल्याने शेतकऱ्यांना झळ पोहोचू लागली आहे़ गुरे बाजारात विक्रीसाठी नेली जात असून दावणी ओस पडू लागल्या आहेत़ विहिरी, बोअर कोरडेठाक पडू लागल्याने हिरवा चारा दुरापस्त बनला असल्याचे वांगी (ता़ बीड) दुधसंकलन संस्थेचे गोरक्षनाथ शेळके यांनी सांगितले़

Web Title: Milk increased; But the price fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.