दूध संकलन आले अर्ध्यावर!
By Admin | Updated: May 8, 2016 23:31 IST2016-05-08T23:11:47+5:302016-05-08T23:31:04+5:30
जालना : कोरडेठाक पडलेले जलसाठे व अत्यल्प चाऱ्यामुळे पशुधन जगविणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच अनेकांनी जनावरांची विक्री केल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम होत आहे

दूध संकलन आले अर्ध्यावर!
जालना : कोरडेठाक पडलेले जलसाठे व अत्यल्प चाऱ्यामुळे पशुधन जगविणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच अनेकांनी जनावरांची विक्री केल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम होत आहे. दिवसाकाठी जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन हजार लिटर दूध संकलन होते. हे प्रमाण एक ते दीड हजारांवर आले आहे. विशेष म्हणजे दूध पुड्यांचीही आवक कमी होत आहे.
गत काही वर्षांत गायी, म्हशींची संख्या रोडावली आहे. यामुळे दुग्ध उत्पादनावरही परिणाम झाला. गतवर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे जलसाठ्यांत अत्यल्प साठा झाला मात्र चारा उत्पादनही झाले नाही. खरीप व रबी हंगामातूनही चाऱ्याचे उत्पादन झाले नाही. ९ लाख जनावरांसाठी १० ते १२ लाख टन चाऱ्याची गरज आहे. मात्र अत्यल्प पावसामुळे चाऱ्याचे उत्पादनाही मोठी घट आली आहे. ज्वारीचा चाराही जेमतेम निघाला.
सर्वसाधारण जिल्ह्याची दूध उत्पादन क्षमता प्रतिदिन सुमारे अडीच लाख लिटर एवढी असल्याचे सांगण्यात येते. हॉटेल, घरगुती वापरसाठी मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री होते. बहुतांश दुध उत्पादक शासनाऐवजी खाजगी संस्थांकडे दुधाची विक्री करीत असल्याने शासनाचे दूध संकलन कमी होत आहे.
काही वर्षांपासून दुष्काळ जिल्ह्याची पाठ सोडत नसल्याने शेतीसह सर्वच उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम होत आहे. दुष्काळामुळे पाणी व चाऱ्याची सोय होत नसल्याने पशुपालक जनावरांची विक्री करीत आहेत. आठवडी बाजारात जनावर विक्री वाढली आहे. जनावरांना पोषक आहार मिळणेही जिकिरीचे झाले आहे. अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर येथून खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात जिल्हाला दूधाचा पुरवठा करतात. जिल्ह्यात ९ लाख ३५ हजार एवढे पशुधन असल्याची नोंद आहे. त्यात बैल व गायी मिळून ४ लाख ५७ हजार, म्हशी ८६ हजार, मेंढी ५१ हजार, शेळी २ लाख ८७ हजार असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)