मायलेकरास जिवंत जाळले
By Admin | Updated: May 6, 2015 00:29 IST2015-05-06T00:27:25+5:302015-05-06T00:29:40+5:30
परंडा : घर बांधकाम, विहिरीच्या कामासाठी माहेरहून दीड लाख रूपये घेवून ये म्हणून विवाहितेसह दोन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर रॉकेल ओतून

मायलेकरास जिवंत जाळले
परंडा : घर बांधकाम, विहिरीच्या कामासाठी माहेरहून दीड लाख रूपये घेवून ये म्हणून विवाहितेसह दोन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची ह्दयद्रावक घटना देवंग्रा (ता़भूम) येथे मंगळवारी दुपारी घडली़ याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हुंडाबळीच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे़
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवंग्रा (ता़भूम ह़मु़चिंचवड पुणे) येथील बळीराम जनार्धन सलगर यांची मुलगी छकुली उर्फ कल्पना (वय २७) हिचा देवंग्रा येथीलच लक्ष्मण बिरमल बरकडे याच्याशी २० मे २००९ रोजी विवाह झाला होता़ विवाहनंतर आदित्य नावाचा मुलगाही या दाम्पत्यास झाला़ मात्र, लग्नानंतर तीन वर्षांनी सासरच्या मंडळींनी विवाहिता कल्पना हिचा पैशासाठी जाच, मारहाण सुरू केली़ घराचे बांधकाम व विहिरीच्या कामासाठी दीड लाख रूपये घेवून ये म्हणून मंगळवारी दुपारी पती लक्ष्मण बिरमल बरकडे, सासू गंगुबाई बिरमल बरकडे, सासरा बिरमल गणपती बरकडे, दीर बापूराव बिरमल बरकडे, जाऊ स्वाती बापूराव बरकडे, नणंद आलकाबाई राजेंद्र टकले यांनी संगणमत करून कल्पना व तिचा दोन वर्षांचा मुलगा आदित्य याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले़ या घटनेत गंभीररित्या होरपळलेल्या कल्पनासह आदित्यचा मृत्यू झाल्याची फिर्याद बळीराम जनार्धन सलगर यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिली़
सलगर यांच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४ (ब), ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि डी़पी़सानप हे करीत आहेत़ दरम्यान, हुंडाबळीच्या या घटनेने देवंग्रासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे़ (प्रतिनिधी)