९० टक्के लहान मुलांत सौम्य लक्षणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:05 IST2021-04-08T04:05:16+5:302021-04-08T04:05:16+5:30
औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लहान मुलांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे साधारणपणे ...

९० टक्के लहान मुलांत सौम्य लक्षणे
औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लहान मुलांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे साधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात. लहान मुलांमधील कोरोना गंभीर स्वरूपाचा होत नाही. ९० टक्के मुलांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात. परंतु योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटनेने म्हटले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या पुणे, मुंबई, औरंगाबाद नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांत वेगाने वाढत आहे. यावेळच्या लाटेचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक संसर्गजन्य विषाणू व लहान मुलांमधील वाढलेले कोविड संसर्गाचे प्रमाण. संपूर्ण बाधित होत आहेत. लहान मुलांच्या संसर्गाबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने नक्की काय करावे, या संभ्रमात पालक असतात. यामुळे बालरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे ‘लहान मुलांमधील कोरोना’ याविषयीची परिस्थिती समोर आणली आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे साधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात. लहान मुलांमधील कोरोना गंभीर स्वरूपाचा होत नाही. ९० टक्के मुलांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात. बालकांना रुग्णालयात भरती करण्याची गरजही कमी पडते. प्रौढांमधील आजार गुंतागुंतीचा होतो. इतर शारीरिक व्याधी (डायबिटीस, उच्च रक्तदाब) या प्रौढांसारख्या लहान मुलांमध्ये नसतात, लसीकरणामुळे मिळालेली प्रतिकारशक्ती मुलांमध्ये असते. लहान मुलांमध्ये व्यसनाधीनता नसल्यामुळे त्यांची फुफ्फुसे निरोगी असतात, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्याम खंडेलवाल, सचिव डॉ. संध्या कोंडपल्ले, डॉ. मंदार देशपांडे यांनी दिली.
लहान मुलांमधील कोरोना आजाराची सर्वसामान्य लक्षणे...
- ६० टक्के मुलांमध्ये कोणतीच लक्षणे आढळत नाहीत.
- सर्दी, ताप, खोकला (सौम्य), उलट्या, जुलाब
- डोकेदुखी, अंगदुखी
- अंगावर पुरळ येणे
- भूक कमी लागणे व थकवा
---
गंभीर व धोक्याची लक्षणे...
- फणफणून आलेला ताप १०० डिग्री फॅरनहाइटच्या पुढे
- बाळ सुस्त होणे
- लघवीचे प्रमाण कमी होणे
- डोळे लाल होणे
- हाता-पायावर सूज व पुरळ येणे
- दम लागणे व कण्हणे
-----
लहान मुलांची कोरोना टेस्ट केव्हा करावी?
१) घरात कोणी कोरोनाबाधित रुग्ण असल्यास, त्याच्या संपर्कात मूल आले असल्यास व त्याच्यात वरील लक्षणे आढळून आल्यास.
२) गंभीर स्वरूपाचा श्वसनमार्गाचा संसर्ग.