पाणीटंचाईमुळे त्रस्त ग्रामस्थांचे स्थलांतर
By Admin | Updated: July 2, 2014 00:18 IST2014-07-01T23:12:40+5:302014-07-02T00:18:32+5:30
नितीन कांबळे , कडा आष्टी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.

पाणीटंचाईमुळे त्रस्त ग्रामस्थांचे स्थलांतर
नितीन कांबळे , कडा
आष्टी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. परिणामी तालुक्यातील वीस पेक्षा अधिक गावातील नागरिकांनी शेत वस्तीवर स्थलांतर केले आहे.
तालुक्यातील १२२ ग्रामपंचायत अंतर्गत १७७ गावे व ३५० वाड्या- वस्त्यांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्याही आष्टी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. यामुळे शासनाच्यावतीने ८४ खाजगी व बारा शासकीय टँकरद्वारे जवळपास २ लाख नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. असे असले तरी ग्रामस्थांची तहान भागत नसल्याने व गेल्या आठ दिवसात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने वीस गावातील ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे.
तालुक्यातील आष्टी, शेकापूर, टाकळसिंग, वाळूंज, खडखत, पारगाव, बावी, कापशी, हातोला, पाटसरा, डोईठाण, घाटापिंप्री, गंगादेवी, वेलतुरी, शेडाळा, कारखेल, गौखेल, दौलावडगाव, सावरगाव, कडा, धानोरा, देवकाळी, शिरापूर, मेहकरी, केरूळ, खिळद, पाटण, सांगवी, मंगरूळ अशा वीस पेक्षा अधिक गावातील ग्रामस्थांनी आपल्या सोयीच्या ठिकाणी स्थलांतर केले आहे.
गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने व पाण्यासाठी भटकंती करूनही पाणीप्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांनी शेतवस्तीवर स्थलांतर केले आहे.
आष्टी, कडा या शहरासह ग्रामीण भागात अनेक शासकीय नोकरदार वास्तव्यास आहेत. त्यांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसात विकत पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. यामुळे अनेक नोकरदार कुटुंबियांनी अहमदनगर शहरात स्थलांतर केल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील अनेक गाव, वाडी, वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी हे पाणी आता कमी पडू लागले आहे. पाऊसच न पडल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. यामुळे काही शेतकरी कुटुंबियांनी जनावरांसह स्थलांतर केले आहे. तर काहींनी आपली जनावरे पाहुण्यांकडे सांभाळण्यासाठी दिले आहेत.
विद्यार्थ्यांचीही भटकंती
तालुक्यात जि.प.च्या २७२ तर माध्यमिक ८ आणि खाजगी ५८ शाळा आहेत. यातील १५२ शाळांमध्ये कुपनलिका आहेत. उर्वरित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इतरत्र पाण्याची सोय करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात मात्र शाळेतही पाणीपुरवठा होत नसल्याने व कुपनलिका कोरड्या पडल्याने विद्यार्थ्यांवर भटकंतीची वेळ आली आहे.
आष्टी तालुक्यातील पाणीटंचाई संदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उद्धव सानप यांना विचारणा केली असता ते म्हणाले, पाणीटंचाई असणाऱ्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी मागणी असेल तेथे टँकरने पाणीपुरवठा करू.