स्थलांतरणाचा डाव

By Admin | Updated: April 9, 2017 23:19 IST2017-04-09T23:18:36+5:302017-04-09T23:19:16+5:30

परळीयेथील राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे गेल्या १५ वर्षांपासून असलेले विभागीय कार्यालय परळीतून बीडला स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Migration of migrants | स्थलांतरणाचा डाव

स्थलांतरणाचा डाव

संजय खाकरे  परळी
येथील राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे गेल्या १५ वर्षांपासून असलेले विभागीय कार्यालय परळीतून बीडला स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याशिवाय परळीतील पाटबंधारे विभागाचे कार्यालयही लातूरला हलविण्याचा डाव आहे.
गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नामुळे परळीला राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय कार्यालय मंजूर झाले. या कार्यालयांतर्गत बीड, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर या चार जिल्ह्यांतील कापूस खरेदी केंद्रांचे नियंत्रण केले जात होते. या कार्यालयातून कापूस खरेदी- विक्रीचे कोट्यवधींचे व्यवहार होत असत. त्यामुळे परळीत चार जिल्ह्यांतून कापूस जिनिंग, प्रेसिंंगचे चालक, मालक यायचे. यातून हॉटेल व्यवसायासह पर्यटनालाही चांगला फायदा होत असे. तसेच विविध कामांच्या निविदा ही परळीच्या कार्यालयातून निघत असत त्यामुळे महसूलही प्राप्त व्हायचा. सहकार क्षेत्रातील या कार्यालयांमुळे परळीचा दबदबा निर्माण झाला होता; परंतु हे कार्यालय बीड येथे असलेल्या पणन महासंघाच्या उपविभागीय कार्यालयात स्थलांतरीत करण्याचे तोंडी आदेश वरिष्ठ कार्यालयातून प्राप्त झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी परळीचे विभागीय कार्यालय हलवू नये यासाठी प्रयत्न केले होते; परंतु पुन्हा आता हे कार्यालय बीड येथे नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परळी कार्यालयावर होणारा भाड्यापोटीचा खर्च व कर्मचाऱ्यांवरील खर्च टाळण्यासाठी परळीतून पणन महासंघाचे विभागीय कार्यालय बीड येथे नेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
परळी येथे युतीच्या काळातच विद्युत मंडळाचे चार जिल्ह्यांसाठीचे विभागीय कार्यालय मंजूर झाले होते. ते यापूर्वीच लातूरला हालविण्यात आले आहे. पाठोपाठ परळीतील पाटबंधारे खात्याचे विभागीय कार्यालयही लातूरला नेण्याच्या हालचाली सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title: Migration of migrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.