बिलोलीतील कस्तुरबा गांधी विद्यालयाचे स्थलांतर पाणीपुरवठ्याअभावी रखडले
By Admin | Updated: July 25, 2014 00:31 IST2014-07-24T23:57:07+5:302014-07-25T00:31:05+5:30
बिलोली : पाणीपुरवठ्याची ठोस योजना नसल्याने बिलोलीतील कस्तुरबा गांधी शाळा बाह्य मुलींच्या विद्यालयाचे नूतन इमारतीत स्थलांतर रखडले आहे.

बिलोलीतील कस्तुरबा गांधी विद्यालयाचे स्थलांतर पाणीपुरवठ्याअभावी रखडले
बिलोली : पाणीपुरवठ्याची ठोस योजना नसल्याने बिलोलीतील कस्तुरबा गांधी शाळा बाह्य मुलींच्या विद्यालयाचे नूतन इमारतीत स्थलांतर रखडले आहे. दीडशे मुलींसाठीची इमारत तयार असून पाणीपुरवठ्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.
अर्धवट शाळा सोडून दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून शासनाने सात वर्षांपूर्वी बिलोली तालुका पातळीवर कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयाचे निर्माण केले होते. प्रारंभी सेवाभावी संस्थाकडून विविध प्रस्ताव मागविण्यात आले. पात्रतेनुसार संबंधित संस्थांना अशा शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र बिलोलीसाठी मंज़ूर शाळा खतगावकर आणि एंबडवार यांच्या उच्चन्यायालयीन लढाईनंतर संस्थेऐवजी स्थानिक शिक्षण विभागाकडे सोपविण्यात आली. तहसीलदार अध्यक्ष, गटशिक्षणाधिकारी पदसिद्ध सचिव म्हणून नेमण्यात आले. पाचवी ते दहावीपर्यंत वर्गही सुरु झाले.
शाळा गांधीनगरच्या परिसरात भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. शाळेसाठी स्वतंत्र मालकीच्या इमारतीसाठी अनुदान मंजूर झाले. इमारतीसाठी उंच टेकडीवर मोकळी जागा देण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला. प्रारंभी बांधकामासाठी पाणी नसल्याने ठेकेदाराने रडत- रडत काम केले. अर्धवट सोडून नंतर तो निघून गेला. दोन वर्षांनंतर दुसऱ्या ठेकेदाराडून इमारतीचे काम करुन घेण्यात आले. टँकरद्वारे पाणी आणून काम पूर्ण झाले. संपूर्ण मुलींसाठी शिकवणी खोल्या, कार्यालय, स्वयंपाक घर, स्वच्छतागृह, वसतिगृह, प्रयोगशाळा, हॉल आदींचे काम पूर्ण झाले. भाड्याच्या इमारतीमधील शाळा रिकामी करुन जून १४ च्या शैक्षणिक वर्षांपासून नूतन इमारतीमध्ये शाळा स्थलांतरीत करावी, असे आदेश नांदेड जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले. मात्र पाण्याअभावी शाळा कशी स्थलांतरीत करावी, ही समस्या उभी राहिल्याने स्थलांतराचा प्रश्न रखडला आहे.
सुरक्षा रक्षकाची आवश्यकता
सद्यस्थिीतील भाड्याची इमारत व शाळा गांधीनगरच्या मध्यवस्तीत आहे. शेजारी इमारत आणि उचभ्रू वस्ती आहे. त्यामुळे येथे भितीचे वातावरण नाही, पण नूतन इमारत उंच टेकडीवर असून पाठीमागे वनखात्याची जमीन आहे. येथे दिवसादेखील निर्मणुष्य परिस्थिती असते. अद्याप तरी कस्तुरबा विद्यालयाकडे कोणत्याही सुरक्षा रक्षकाची नियुक्ती झालेली नाही. मुलींना शिकविणाऱ्या सर्वच महिला शिक्षिका आहे, अशा स्थितीत कोणती घटना होईल. हे सांगता येत नाही. मुलींच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने येथे बंदूकधारी सुरक्षा रक्षकाची गरज आहे, असे मुख्याध्यापिका जी. आर. सावळे यांनी सांगितले.
बिलोली पालिका पाणी पुरवठा करेल, असे आश्वासन पालिका प्रशासनाडून आल्यानंतरच येथे इमारत पूर्ण करण्यात आली. सध्या पाण्याची सोय न झाल्यानेच स्थलांतर थांबले आहे. संपूर्ण मूलभूत सुविधा पूर्ण झाल्याची खात्री पटल्यानंतरच निवासी शाळा हलविण्यात येईल- माधव सलगर, गटशिक्षणाधिकारी तथा सचिव
बिलोली शहरवासीयांनाच मागील दोन वर्षांपासून एक- दिवस आड व एकच वेळ पाणीपुरवठा होत आहे. बिलोलीच्या जलकुंभातून पाणी देणे शक्यच नाही. शाळा प्रशासनाने स्वतंत्र उपायायोजना हाती घ्यावी. त्यात उंच टेकडीवर पाणीपुरवठा कसे शक्य आहे- भीमराव जेठे, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष
कोणत्याही अप्रिय घटना नाकारता येत नाहीत. राज्यासह देशात महिला अत्याचाराबाबतच्या घटना आपण दररोज पाहत आहोत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी २४ तास रक्षकाची कायम नियुक्ती करावी- जमनाबाई खंडेराय, नगराध्यक्षा, बिलोली