जिल्हाधिकाऱ्यांची मध्यरात्री धाड
By Admin | Updated: June 2, 2016 23:22 IST2016-06-02T23:17:25+5:302016-06-02T23:22:50+5:30
सोनपेठ : जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांनीच कारवाईचा धडाका लावला आहे़

जिल्हाधिकाऱ्यांची मध्यरात्री धाड
सोनपेठ : जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांनीच कारवाईचा धडाका लावला आहे़ बुधवारी मध्यरात्री सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी कारवाई करीत दोन संशयितांसह अवैधरित्या वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली आहेत़ या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे़
सोनपेठ आणि गंगाखेड तालुक्यामध्ये गोदावरी नदी कोरडी असल्याने नदीपात्रातून रात्रंदिवस अवैधरित्या वाळुचा उपसा केला जात आहे. १ जून रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल महिवाल सोनपेठ तालुक्यात दाखल झाले़ यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत महसूलचे पथकही होते़
या पथकाने तालुक्यातील खडका, कान्हेगाव, डोबाडी तांडा आदी ठिकाणी छापे टाकले़ यावेळी वाळू उपसा केला जात असताना सुनील यादव, व्यंकट सुरवसे व अंकुश ढवारे या तिघांसह एमए २४/एबी- ७००३ या क्रमांकाचा टिप्पर, एमएच २४/एएफ-३८१४ या क्रमांकाची स्कॉर्पिओ जीप पथकाने ताब्यात घेतली़ दरम्यान, या सर्व कारवाईत सुनील यादव हा पळून जाण्यास यशस्वी ठरला़ व्यंकट सुरवसे व अंकुश ढवारे या दोन आरोपींना पकडून दोन्ही वाहने पथकाने जप्त केली़ या पथकात तहसीलदार जीवराज डापकर, शिवाजी भराड, यादव, पोलिस कॉन्स्टेबल गुट्टे, वाघमारे यांचा समावेश होता़ (प्रतिनिधी)